Friday, June 21, 2024
Homeताजी बातमीजगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ चिखली येथे मुक्त सांप्रदायिक संगीत शिक्षणाचा उद्घाटन...

जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ चिखली येथे मुक्त सांप्रदायिक संगीत शिक्षणाचा उद्घाटन सोहळा संपन्न

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका संचलित जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ टाळगांव चिखली येथे प्रमुख पाहुणे व ग्रामस्थांच्या उपस्थितीत व मान्यवरांच्या शुभहस्ते मुक्त सांप्रदायिक संगीत शिक्षणाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष तथा संतपीठाचे संचालक ह.भ.प. डाॅ. सदानंद मोरे उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा संतपीठाचे अध्यक्ष शेखर सिंह तर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माजी महापाैर उषा उर्फ माई ढोरे तसेच आळंदी देवस्थानचे विश्वस्थ तथा संतपीठाचे संचालक ह.भ.प. डाॅ. अभय टिळक, वारकरी शिक्षण संस्था आळंदी चे विश्वस्थ ह.भ.प. दिनकर शास्त्री भुकेले आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान प्रास्ताविकपर भाषनात संतपीठाचे संचालक ह.भ.प. अभय टिळक यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठाच्या सुरुवातीपासुन ते आजपर्यंतच्या प्रगतीचा आलेख मांडत असताना ” भक्ती हा संतांच्या जीवनाचा प्राण असला तरी त्या भक्तीला ज्ञानाच अधिष्ठान असलेल्या निरंतर शिक्षणाचे उगमस्थान किंवा उर्जाकेंद्र म्हणजे संतपीठ असेल” असे गाैरवोद्गार काढले.

पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा संतपीठाचे अध्यक्ष शेखर सिंह यांनी सर्व वाद्यांची पुजा करुन मुक्त सांप्रदायिक संगीत शिक्षणाचे उद्घाटन करत असताना “संगीत वाद्यांच्या कंपनामधुन निघणार्‍या लहरींचा मोठा परिणाम जीवनावर होत असतो त्यामुळे ती कंपने आपण दिर्घकाळापर्यंत जपुन ठेवली पाहीजेत तसेच ‘संतपीठ हे मुक्त सांप्रदायिक संगीत शिक्षण देणारे अद्वितीय माध्यम ठरेल’ असे विचार व्यक्त केले.

‘मुक्त सांप्रदायिक संगीत शिक्षणाच्या माध्यमातुन लहान थोरांना अध्यात्मिक व्यासंग प्राप्त होणार असुन अशा पद्धतीचे शिक्षण देणारे टाळगांव चिखली येथे साकारले गेलेले संतपीठ याचा एक आदर्श नमुना ठरेल असे विचार पिंपरी-चिंचवड शहराच्या माजी महापाैर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.

भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी दुरभाष्य प्रणाली द्वारे आपला शुभेच्छा संदेश पाठवुन मुक्त सांप्रदायिक संगीत शिक्षणाच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या तसेच वारकरी शिक्षण संस्थेचे विस्वस्थ श्री दिनकर शास्त्री भुकेले यांनी देखील सर्व उपस्थितांच्या वतीने प्रातिनिधीक स्वरुपात या संकल्पनेस शुभेच्छा दिल्या.

ह.भ.प. डाॅ. सदानंद मोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ‘ देहू- आळंदी परिसरातील टाळगांव चिखली हे विशेष पारमार्थिक क्षेत्र असुन टाळगांव चिखलीमध्ये संतपीठामध्ये मुक्त सांप्रदायिक संगीत शिक्षणाची संकल्पना राबवली गेल्याने सांस्कृतिक व पारमार्थिक संगम होणे शक्य होणार आहे’ असे विचार प्रगट केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला वारकरी सांप्रदायाचा गाभा असलेले पंचपदी भजन संतपीठाचे संचालक ह.भ.प. राजु महाराज ढोरे यांच्यासह मुक्त सांप्रदायिक संगीत विभागाच्या सर्व संगीत शिक्षकांनी सादर केले.कार्यक्रमादरम्यान मुक्त सांप्रदायिक संगीत शिक्षणासाठी प्रवेश नोंदविलेल्या प्रथम दहा भाग्यवान विजेत्यांना तुकाराम महाराजांची मुर्ती, शाल व श्रीफळ देवुन मान्यवरांच्या हस्ते गाैरविण्यात आले.

कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक कुंदन गायकवाड, दिनेश यादव, संतोष मोरे, वृक्ष प्राधिकरन समिती चे सदस्य आनंदा यादव, टाळगांव चिखली प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष रोहिदास मोरे, सामाजिक कार्यकर्ते अंकुश मळेकर, विनायक आबा मोरे तसेच संतपीठाच्या संचालिका डाॅ. स्वाती मुळे, संचालक ह.भ.प. राजु ढोरे यांच्यासह संतपीठ सांस्कृतिक, चिंतन, अभ्यासक व सल्लागार समितीचे सदस्य तसेच टाळगांव चिखली चे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतपीठाचे अभ्यासक प्राचार्य ज्ञानेश्वर गाडगे यांनी तर आभार प्रदर्शन संतपीठाच्या प्रभारी प्राचार्या स्नेहल पगारे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments