Tuesday, February 11, 2025
Homeताजी बातमीपिंपरीत उलगडणार "शिवपुत्र संभाजी" महानाट्य !!! एच. ए. मैदानावर ११ ते १६...

पिंपरीत उलगडणार “शिवपुत्र संभाजी” महानाट्य !!! एच. ए. मैदानावर ११ ते १६ मे दरम्यान प्रयोग

डॉ. अमोल कोल्हे अभिनित आणि महेंद्र महाडिक लिखित, दिग्दर्शित “शिवपुत्र संभाजी” या भव्यदिव्य बहुप्रतिक्षित महानाट्याचे आयोजन पिंपरी चिंचवड येथे ११ मे ते १६ मे दरम्यान सायंकाळी ६:३० वाजता हिंदुस्थान अँटिबायोटिक ग्राऊंड (एच.ए.) पिंपरी येथे होणार आहे, अशी माहिती डॉ. अमोल कोल्हे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

या महानाट्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत डॉ. अमोल कोल्हे स्वतः असून राजन बने बादशहा औरंगजेबाची भूमिका निभावणार आहेत. सोबतच महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत स्नेहलता वसईकर, अनाजीपंतांच्या भूमिकेत महेश कोकाटे, दिलेरखान आणि मुकर्रबखान अशा दुहेरी भूमिकेत विश्वजीत फडते कवि कलशांच्या भूमिकेत अजय तपकीरे आणि सरसेनापती हंबीररावांच्या भूमिकेत रमेश रोकडे अशा सिनेकलावंतांचा सहभाग या महानाट्यात आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांची प्रेक्षकांमधून चित्तथरारक घोडेस्वारी, तडाखेबाज संवाद, १२० फुटी रंगमंच ५५ फुटी तीन मजली किल्ल्याची प्रतिकृती, मराठे मोगल रणसंग्राम, २२ फुटी जहाजावरून जंजिर मोहीम, थेट प्रेक्षकांमधून जाणारी गनिमिकाव्याची बुऱ्हाणपूर मोहीम, संपूर्ण मैदानाचा रंगमंच म्हणून वापर सोबतच शहरातील स्थानिक कलाकारांना देखील या महानाट्यात काम करण्याची संधी देण्यात आली आहे. यामध्ये भाग घेण्यासाठी सौरभ 967372284 आणि अभिजित 9975264772 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन महानाट्याचे लेखक व दिग्दर्शक महेंद्र महाडिक यांनी केले आहे. या महानाट्याचे आचार्य ॲकॅडमी मुख्य प्रायोजक तर सारस्वत बँक, फरांदे बिल्डर्स, सोनिगरा ज्वेलर्स, मोरेश्वर कन्स्ट्रक्शन हे सहप्रायोजक आहेत.

तब्बल नऊ वर्षांनी हे महानाट्य पुन्हा एकदा पिंपरी चिंचवडकरांच्या भेटीला आले असून शहरातील हिंदुस्थान अँटिबायोटिक ग्राऊंड – पिंपरी, रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह – चिंचवड, आचार्य अत्रे रंगमंदिर – संत तुकाराम नगर, पिंपरी, निळूभाऊ फुले नाट्यगृह – नवी सांगवी, बालगंधर्व रंगमंदिर – पुणे, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह – कोथरूड येथे तिकीट विक्री सुरू असून बुक माय शो वर ऑनलाईन तिकीट बुक करता येऊ शकते. तिकीट विक्रीस भरघोस प्रतिसाद मिळत असून शाळा व महाविद्यालयातून देखील हे महानाट्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे ग्रुप बुकिंग होत आहे. स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचा इतिहास भावी पिढीला समजावा आणि त्यातून प्रेरणा घेण्यासाठी नक्की हे महानाट्य पाहावे असे आवाहन डॉ. अमोल कोल्हे यांनी यावेळी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments