Friday, October 4, 2024
Homeगुन्हेगारीताथवडे मधील ‘ते’ भीषण स्फोट अवैधरित्या गॅस रिफ्लिंग करताना झाल्याचं उघड…

ताथवडे मधील ‘ते’ भीषण स्फोट अवैधरित्या गॅस रिफ्लिंग करताना झाल्याचं उघड…

ताथवडे येथील ‘तो’ भीषण स्फोट अवैधरित्या गॅस रिफ्लिंग करताना झाल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. कॅप्सूल टँकरमधून अवैधरित्या गॅस भरला जात होता आणि तेव्हाच भीषण असे तीनपेक्षा अधिक स्फोट झाले. यामुळे शेजारी असलेल्या तीन ते चार स्कूल बसने पेट घेतला. त्या जागी नऊ गॅस सिलेंडर फुटले असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे. ही घटना रविवारी रात्री अकराच्या सुमारास ताथवडे परिसरात घडली होती.

पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, २१ टनाच्या प्रोपिलीन गॅस कॅप्सूल टँकरमधून काहीजण अवैधरित्या घरगुती गॅस आणि कमर्शियल सिलेंडरमध्ये गॅस भरत होते. गॅस भरला जात असताना त्याची गळती झाली आणि विजेच्या संपर्कात आल्याने त्याचा भीषण असा स्फोट झाला. तीनपेक्षा अधिक स्फोट झाल्याने परिसरातील नागरिक, विद्यार्थी सैरावैरा धावत होते. काही किलोमीटर अंतरावर धुराचे आणि आगीचे लोळ दिसत होते. या भीषण स्फोटाचा आवाज काही किलोमीटरपर्यंत गेला, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. स्फोट झाल्याने अवैधरित्या गॅस रिफ्लिंग करणारे त्या ठिकाणाहून पसार झाले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.

एकापाठोपाठ एक नऊ गॅस सिलेंडर फुटल्याने भीषण स्फोट झाल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले. गॅस पसरल्याने जवळच पार्क केलेल्या तीन ते चार स्कूल बस यात जळून खाक झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पिंपरी, थेरगाव, प्राधिकरण, रहाटणी, चिखली, भोसरी, तळवडे, हिंजवडी MIDC या ठिकाणच्या अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं असून आग विझवण्यात त्यांना यश आलं आहे. तसेच पिंपरी-चिंचवड पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. या घटनेमुळे पुन्हा एकदा पिंपरी- चिंचवड शहरातील अवैधरित्या गॅस रिफ्लिंग करणाऱ्या टोळीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या अगोदर देखील गॅस रिफ्लिंग करताना काही जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी तात्पुरती कारवाई न करता अशा गोष्टींना आळा बसेल, अशी कारवाई करणे आता गरजेची आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments