९ जुलै २०२१,
केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडे यांना स्थान न दिल्याने भाजपा नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात राज्यसभा सदस्य डॉ. भागवत कराड यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंडे भगिनींना डावलल्याचा सूर समर्थकांतून व्यक्त होत आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय राहिलेले डॉ. कराड यांना पहिल्यांदाच राज्यसभा आणि वर्षभरातच थेट मंत्रीपद मिळाल्याने मुंडे भगिनी समर्थकांना नेमके काय व्यक्त व्हावे असा प्रश्न पडला आहे. दरम्यान पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे अशी शंका शिवसेनेने सामना संपादकीयमधून व्यक्त केली आहे.
“श्री. भागवत कराड हे राज्यमंत्री झाले. पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे. कराड हे गोपीनाथ मुंडेंच्या सावलीत वाढले, पण प्रीतम मुंडे यांचा विचार न करता कराड यांना मंत्री केले गेले. वंजारी समाजात फूट पाडण्यासाठी व पंकजा मुंडे यांना धडा शिकविण्यासाठीच हे केले काय, अशी शंका घ्यायला जागा आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.
“कपिल पाटील, डॉ. भारती पवार हे दोन राज्यमंत्री म्हणजे महाराष्ट्रातील निष्ठावंत भाजपवाल्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे. कपिल पाटील व भारती पवार हे कालच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले व आता मंत्री झाले. हाच खरा धक्कातंत्राचा प्रकार आहे,” असं शिवसेनेने सांगितलं आहे.