देश-विदेशातील चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकारांची उपस्थिती; स्पर्धात्मक विभागात लाखो रुपयांची बक्षिसे
नांदेड | प्रतिनिधी
ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाने समृद्ध असलेल्या नांदेड शहरात प्रथमच ‘नांदेड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (NIFF) २०२७’ आयोजित करण्यात येणार आहे. हा महोत्सव २ ते ७ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत पार पडणार असून, देश-विदेशातील नामवंत चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, तंत्रज्ञ, चित्रपट अभ्यासक आणि रसिक एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत.
श्री गुरु गोविंदसिंह महाराजांच्या पवित्र स्मृतींमुळे जगभर ओळख असलेल्या नांदेडला या महोत्सवाच्या माध्यमातून जागतिक चित्रपट नकाशावर विशेष स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. स्थानिक संस्कृती, इतिहास आणि कलाविश्वाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासह मराठवाड्यातील नवोदित चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते आणि तंत्रज्ञांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे.
महोत्सवादरम्यान जागतिक दर्जाच्या चित्रपटांचे प्रदर्शन, परिसंवाद, मास्टरक्लास, कार्यशाळा, चर्चासत्रे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक कलाकार, विद्यार्थी आणि चित्रपटप्रेमींना आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील मान्यवरांशी थेट संवाद साधण्याची आणि त्यांच्या अनुभवातून शिकण्याची संधी मिळणार आहे.
महोत्सवाचे फेस्टिव्हल डायरेक्टर रमेश होलबोले यांनी सांगितले की, हा महोत्सव केवळ चित्रपटांचा उत्सव नसून स्थानिक प्रतिभेला जागतिक व्यासपीठाशी जोडणारा सांस्कृतिक सेतू ठरणार आहे. मराठवाड्यातील नवोदित कलाकारांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महोत्सवाचे आयोजन सन्मान स्क्वेअर सितारा सिनेमा तसेच नांदेड शहरातील इतर चित्रपटगृहांमध्ये करण्यात येणार आहे. महोत्सवात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक विभागांचा समावेश असून विजेत्यांना रोख पारितोषिके, ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय आणि मराठी फीचर चित्रपट विभागात प्रथम क्रमांकासाठी ₹१.५० लाख, तर द्वितीय क्रमांकासाठी ₹७५ हजार इतके पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय लघुपट, माहितीपट आणि विद्यार्थी चित्रपट विभागांसाठीही आकर्षक रोख बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे.
देश-विदेशातील चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि निर्मिती संस्थांनी आपल्या चित्रपटांच्या प्रवेशिका महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळ www.niff.in तसेच FilmFreeway या व्यासपीठाद्वारे सादर करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. हा महोत्सव नांदेडच्या सांस्कृतिक अस्मितेला जागतिक ओळख मिळवून देणारा आणि मराठवाड्यातील चित्रपट संस्कृतीला नवी चालना देणारा ऐतिहासिक उपक्रम ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.


