पिंपरी-चिंचवड ही कष्टकरी, कामगारांची नगरी आहे. शहारात जागा उपलब्ध असल्यास कामगारांसाठी सोलापूरच्या धर्तीवर गृहप्रकल्प उभारण्याचा मानस आहे. त्यामुळे कामगार वर्गाचे घराचे स्वप्न पूर्ण होईल. लोकांची मानसिकता, प्रतिसाद असेल तर चर्चा करून गृहप्रकल्प राबविण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तसेच ज्या विकसकांनी पुर्नवसन प्रकल्प अनेक वर्षे रखडवले आहेत. त्यांना नोटीस देऊन प्रकल्प ताब्यात घेऊन म्हाडाच्या माध्यमातून विकसित करावेत, अशी सूचनाही त्यांनी प्रशासनाला केली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने पिंपरी आणि आकुर्डी येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उभारलेल्या गृहप्रकल्पातील लाभार्थी निश्चित करण्यासाठी चिंचवड येथे पवार यांच्या हस्ते शनिवारी संगणकीय सोडत काढली. त्यावेळी ते बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, आमदार अण्णा बनसोडे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यावेळी उपस्थित होते.
चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी, डुडुळगाव, आकुर्डी, पिंपरी, रावेत याठिकाणी इच्छुकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहप्रकल्प राबविण्यात येत आहेत. राज्यात एकूण लोकसंख्येच्या २ टक्के दिव्यांग आहेत. त्यांनाही चांगले घर मिळविण्याचा हक्क आहे. रावेतमध्ये प्रकल्प उभारण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. महानगरपालिकेतर्फे आयोजित सोडतीचा कार्यक्रम संगणकीय प्रणालीवर आधारीत असून अत्यंत पारदर्शक आहे. त्यामुळे नागरिकांनी मध्यस्थकडून होणाऱ्या फसवणूकीला बळी पडू नये. सोडतीत घर न मिळाल्यास नागरिकांनी निराश होऊ नये. म्हाडा किंवा शासनाच्या इतर योजनांच्या घरांसाठी प्रयत्न करावे. शहरात अधिकाधिक गृहप्रकल्प उभारण्याचा प्रयत्न राहील, असे श्री.पवार म्हणाले. गृहनिर्माण प्रकल्पात योगदान देणाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
खासदार बारणे म्हणाले, हक्काचे घर मिळावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. प्रधानमंत्री आवास योजनेमुळे हे शक्य झाले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अनेक चांगले उपक्रम राबविले आहेत. केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत विविध चांगली कामे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात झाली आहेत. महानगरपालिकेने आवास योजना राबवितांना त्याचा दर्जा चांगला राहील याची दक्षता घ्यावी. गरीब माणसाला वास्तूत गेल्यावर समाधान लाभावे अशी घराची रचना असावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक योजनांचा नागरिकांना लाभ देण्यात आल्याचेही ते म्हणाले.
मनपा आयुक्त श्री.सिंह यांनी प्रास्ताविकात प्रकल्पाविषयी माहिती दिली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकूण ९३८ सदनिकांची सोडत काढली जात आहे. सोडतीचा निकाल महापालिकेच्या संकेतस्थळावर आणि लाभार्थ्यांच्या मोबाईलवर देण्यात येणार आहे. पिंपरी प्रकल्पात ३७० सदनिका असून त्याची एकूण किंमत एकूण ४७ कोटी असून त्यात केंद्राचा हिस्सा ५ कोटी ५० लक्ष आणि राज्याचा ३ कोटी ७० लक्ष आहे. आकुर्डी प्रकल्पात ५६८ सदनिका असून त्याची एकूण किंमत ७० कोटी आहे. त्यात महानगरपालिकेचा हिस्सा १६ कोटी ८० लक्ष, राज्य शासन ५ कोटी ६० लक्ष, केंद्र सरकार ८ कोटी ५० लक्ष असून उर्वरीत लाभार्थ्यांचा हिस्सा आहे. दोन्ही प्रकल्पाचे ३० चौरस मीटर चटई क्षेत्र असून त्यात सर्व प्रकारच्या आवश्यक सुविधा देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.