अजित पवारांच्या बंडखोरीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एका शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. पाठिंबा जाहीर केल्यानंतर काही वेळातच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतरही काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घेणाऱ्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांच्यासह इतरही नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान, अजित पवारांच्या बंडखोरीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एका शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या बंडखोरीवर एक ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी शरद पवारांचा १३ सेकंदाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आश्वासक चेहरा कोण? या प्रश्नावर स्वत: शरद पवारांनी उत्तर दिलं आहे. ज्यामध्ये त्यांनी स्वत:चं नाव घेतलं आहे. हा व्हिडीओ शेअर करत सुप्रिया सुळेंनी ‘प्रेरणास्थान’ (Inspiration) असं एका शब्दात आपली भावना मांडली आहे. सुप्रिया सुळेंचं हे ट्वीट सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.
खरं तर, अजित पवारांच्या बंडखोरीनंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी एका पत्रकाराने शरद पवारांना विचारलं, राष्ट्रवादी काँग्रेसचा आश्वासक चेहरा कोण वाटतो? यावर शरद पवारांनी स्वत:चा हात उंचावत आणि स्मितहास्य करत ‘शरद पवार’ असं उत्तर दिलं आहे. हाच व्हिडीओ सुप्रिया सुळेंनी ट्विट केला असून ‘प्रेरणास्थान’ असं कॅप्शन लिहिलं आहे.
दुसरीकडे, अजित पवारांच्या बंडखोरीवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, अजित पवारांबरोबर गेलेल्या काही सहकाऱ्यांनी आजच माझ्याशी संपर्क साधला आहे. आमची वेगळी भूमिका आहे, असं त्यांनी मला सांगितलं आहे. आम्हाला याठिकाणी निमंत्रित करून आमच्या सह्या घेतल्या पण आमची भूमिका वेगळी आहे. आमची भूमिका कायम आहे, याचा खुलासा अजित पवारांबरोबर गेलेल्या आमदारांनी केला आहे. त्यामुळे याबाबत मी आताच काही बोलू इच्छित नाही.