Monday, July 14, 2025
Homeताजी बातमीमहापालिकेकडून आळंदी पालखी मार्गाची पाहणी

महापालिकेकडून आळंदी पालखी मार्गाची पाहणी

आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने सुरु असलेली अंतिम टप्प्यातील कामे प्रगतीपथावर असून आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त येणाऱ्या भाविकांना सर्व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचे मत अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी व्यक्त केले.

आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पिंपरी चिंचवड शहरातून जाणार आहे. या पालखी मार्गाची पाहणी आज अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केली,त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे, सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, बाबासाहेब गलबले, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, उप आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी ढगे, सहाय्यक आयुक्त पंकज पाटील, कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार, हरविंदरसिंग बन्सल, संध्या वाघ, विलास देसले, महेश कावळे, वैशाली ननावरे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

प्रारंभी अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी आळंदी येथे इंद्रायणी नदीची पाहणी केली. नदीतील जलपर्णी काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून तेथील अनुषंगिक कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी दिल्या. पालखी मार्गातील रस्ते दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत, या मार्गावरील अनधिकृत होर्डिंग, बॅनर तातडीने निष्कासित करावेत. पालखी मार्गावरील विद्युत खांब आणि पथदिवे सुस्थितीत राहतील याची दक्षता घ्यावी. पालखी मार्गातील दुभाजकांमध्ये वाढलेल्या शोभेच्या झाडांची छाटणी करून सुशोभीकरणाच्या कामांना वेग द्यावा. दिघी आळंदी मार्गावरील मॅगझीन चौक येथे महापालिकेच्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे स्वागत करण्यात येते. येथील मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून पालखी आगमनाच्या दिवशी तेथे अग्निशामक वाहन, रुग्णवाहिका, धुलीकण नियंत्रक वाहन तैनात ठेवावे अशा सूचना देखील त्यांनी संबंधितांना दिल्या.

दरम्यान, पालखी मार्गात भाविकांच्या सेवेसाठी ठिकठिकाणी स्वच्छ पिण्याचे पाणी, पुरेसे फिरते शौचालये, महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग मशिन उपलब्ध करून देणार असल्याचे ते म्हणाले. तसेच ठिकठिकाणी सुरक्षा यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात ठेऊन तात्पुरते प्रथमोपचार केंद्र स्थापित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पालखीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या इन्सिडेन्ट कमांडर यांनी आपली जबादारी चोखपणे पार पाडावी. ही वारी हरित वारी करण्यासाठी वृक्षरोपण करण्यात येणार आहे. प्लास्टिकचा वापर टाळून स्वच्छ व सुंदर वारीचा संकल्प केला असल्याचे अतिरिक्त आयुक्त खोराटे यावेळी म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments