पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव येथे एका सराईत गुन्हेगाराने ‘आपल्याला भाई का म्हटलं नाही’ या रागातून एका तरुणाला इतर सहकाऱ्यांच्या मदतीने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. तरुणाला जमिनीवर पडलेली बिस्किटं खायला लावत मारहाण केली आहे. रोहन उर्फ गंग्या वाघमारे असं मारहाण करणाऱ्या गुन्हेगाराचं नाव आहे. तो पुण्याच्या खडकवासला परिसरात राहतो अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं असून मुख्य आरोपी रोहन हा मात्र फरार आहे. त्याचा शोध वाकड पोलीस घेत आहेत.
नेमक काय घडलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहन वाघमारे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याला यापूर्वी तडीपार करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच त्याची तडीपारी संपल्याने तो हद्दीत आला होता.घटनेच्या वेळी आरोपी रोहनने पीडित तरुणाला भेटायला बोलावले. पीडित तरुण भेटायला गेल्यानंतर आरोपीने तरूणाने रोहनला तू मला फोनवर शिवीगाळ का केली, अशी विचारणा केली. याचा राग आल्याने तू मला रोहन का म्हणालास, मला भाई का नाही म्हणाला, मी या एरियाचा भाई आहे, असे म्हणत रोहनने तरूणाला शिवीगाळ केली. तसेच कमरेच्या बेल्टने मारहाण करत जमीनीवर टाकलेली बिस्किटे खाण्यास भाग पाडले. इतर आरोपींनीही तरूणाला शिवीगाळ करत बेल्टने व लाथाबुक्क्यानी बेदम मारहाण केली.
गुन्हा केला दाखल या घटनेचा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला आहे. रोहन वाघमारे या सराईतासह प्रशांत आठवडे (रा. शिवकॉलनी, गणेशनगर, थेरगाव), आदित्य काटे (रा. ताथवडे), प्रेम शिंदे (रा. लोकमान्य कॉलनी, गणेशनगर, थेरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. २० वर्षीय तरूणाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.