Monday, July 20, 2026
Homeअर्थविश्वइंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाची ४३० कोटींची निविदा 'आयत्या वेळी' मंजूर;पारदर्शकतेवर संशय, चौकशीची...

इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाची ४३० कोटींची निविदा ‘आयत्या वेळी’ मंजूर;पारदर्शकतेवर संशय, चौकशीची मागणी

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी तब्बल ₹४३०.७५ कोटींच्या निविदेला आयत्या वेळी (ऐनवेळी) मंजुरी देण्यात आल्याने मोठा राजकीय वाद पेटला आहे. एवढ्या मोठ्या आर्थिक उलाढालीचा विषय शेवटच्या क्षणी मंजुरीसाठी आणण्यामागच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधी सदस्यांनी या निर्णयाला जोरदार विरोध केला. मात्र, सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर करून घेतला.

पारदर्शकतेवर संशय आणि चौकशीची मागणी

गेल्या वर्षभरापासून रखडलेली ही निविदा प्रक्रिया अचानक अंतिम टप्प्यात आणून घाईघाईने मंजूर केल्यामुळे संपूर्ण प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर विरोधकांनी तीव्र संशय व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रक्रियेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

मुख्य अभियंत्यांच्या संपत्तीची चौकशी करा – सुलभा उबाळे

शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे यांनी महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेतले. “महानगरपालिकेतील प्रत्येक मोठा आर्थिक विषय नेहमी आयत्या वेळीच का मंजुरीसाठी आणला जातो? यामागे नक्कीच काहीतरी संशयास्पद कारण आहे,” असा थेट आरोप करत त्यांनी कुलकर्णी यांच्या कामकाजासह त्यांच्या संपत्तीचीही चौकशी करण्याची मागणी केली.

महाराष्ट्रातील कंपन्या अपात्र, बाहेरील कंपनीला झुकते माप – संदीप वाघेरे

राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य संदीप वाघेरे यांनी निविदा प्रक्रियेत ‘रिंग’ झाल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “या निविदेत गुजरातमधील कंपनीला प्राधान्य दिले गेले आहे. महाराष्ट्रातील नामांकित कंपन्यांना अपात्र ठरवून बाहेरील राज्यातील कंपनीला काम देणे संशयास्पद आहे.” विशेष म्हणजे, मुळा नदी सुधारणा प्रकल्पाचे काम यशस्वीरीत्या करणारी ‘बी. जी. शिर्के’ सारखी मातब्बर कंपनीही या निविदा प्रक्रियेत अपात्र ठरल्याने विरोधकांच्या संशयाला बळ मिळाले आहे.

सत्ताधाऱ्यांचे स्पष्टीकरण: भूमिपूजनाची घाई नडली?

या सर्व आरोपांवर आणि गदारोळावर स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी प्रशासनाची बाजू लावून धरली. आगामी ७ जुलै रोजी या प्रकल्पाचा प्रस्तावित भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे, त्यामुळेच हा विषय तातडीने मंजुरीसाठी आणण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, या प्रकल्पामुळे इंद्रायणी नदीतील प्रदूषण मोठ्या प्रमाणावर कमी होऊन नदी संवर्धनाला गती मिळेल, असा दावाही त्यांनी केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments