Friday, November 1, 2024
Homeमहाराष्ट्रइंद्रायणी, पवना घेणार मोकळा श्वास… लवकरच होणार पुनरुज्जीवन

इंद्रायणी, पवना घेणार मोकळा श्वास… लवकरच होणार पुनरुज्जीवन

पवना, इंद्रायणी आणि मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता उगमापासूनच प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. पिंपरी महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), जिल्हा प्रशासन, ग्रामस्थांच्या पुढाकारातून नदीकाठच्या गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारण्याचे नियोजन केले आहे. पुढील दोन वर्षांत ही प्रक्रिया मार्गी लागून नदी प्रदूषण रोखण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरी तीन नद्यांच्या खोऱ्यात आहे. शहराच्या उत्तरेकडून इंद्रायणी, दक्षिणेकडून मुळा आणि मध्यातून पवना नदी वाहते. मुळा व पवनेचा संगम जुनी सांगवी येथे झाला आहे. संगमापासून पुढे मुळा नावाने नदी ओळखली जाते. मुळा नदीचा उगम मुळशी तालुक्यात असून, शहरातील पात्र पुणे महापालिकेच्या हद्दीत आहे. केवळ उत्तरेकडील काठ पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे आहे. पवना व इंद्रायणी नद्यांचा उगम मावळ तालुक्यात आहे. मामुर्डी येथून पवना नदी शहरात प्रवेश करते. इंद्रायणी नदीचे पात्र महापालिकेकडे असून, उत्तर काठ ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत आहे. या दोन्ही नद्यांचे शहराच्या हद्दीतील पुनरुज्जीवन महापालिका करीत आहे. तर मुळा नदीचे पुनरुज्जीवन पुणे महापालिकेच्या सहकार्याने केले जाणार आहे. मात्र, नद्यांच्या उगमापासून शहराच्या हद्दीपर्यंतही मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे आढळून आले आहे.

औद्योगिक वसाहती, नदीकाठच्या कारखान्यांतील रसायनयुक्त पाणी, गावांमधील मैलायुक्त पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट पवना, इंद्रायणी नदीपात्रात सोडले जाते. मैलायुक्त पाणी नद्यांना प्रदूषित करत आहे. यातील काही गावांत ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगर परिषद, देहूरोड कटक मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आहे. काही गावांचा समावेश ‘पीएमआरडीए’मध्ये झालेला आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून नद्यांच्या प्रदूषणावर उपाययोजना करण्याची सूचना राज्य शासनाने केली होती. त्यानुसार प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे.

या गावांमध्ये प्रकल्प
लोणावळा, तळेगाव दाभाडे, आळंदी नगर परिषद, देहू, वडगाव नगरपंचायत, देहूराेड कटक मंडळ, कुसगाव बुद्रुक, कामशेत-खडकाळे, इंदुरी ही १५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येची, तर कार्ला, वरसोली, कान्हेवाडी, येलवडी, आंबी, जांभूळ, कान्हे, गोळेगाव, सोळू, तुळापूर, मरकळ, नाणे, टाकवे बुद्रुक, सांगुर्डी, वडगाव शिंदे या १५ हजारांपेक्षा कमी लोकसंख्येच्या गावांत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार आहेत. उर्वरित २४ गावांचे गट करून प्रकल्प उभारला जाणार आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारल्याने गावांमधील पाणी प्रक्रिया करूनच नदीत सोडले जाईल. राज्य सरकारच्या सहकार्याने पवना, इंद्रायणी नदी स्वच्छ, प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने ही कामे कमी वेळेत पूर्ण केली जाणार आहेत. महापालिचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे म्हणाले की, उगम ते शहर या दरम्यान नद्यांचे प्रदूषण थांबल्यानंतर शहरातील नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे उद्दिष्ट साध्य होईल. त्यामुळे नदीकाठच्या गावांनाही चांगले पाणी मिळेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments