२७ सप्टेंबर २०२१,
भारत चीनदरम्यानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनच्या हलचाली पुन्हा वाढल्या आहेत. चीनने पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ आपल्या क्षेत्रामध्ये ५० हजारहून अधिक सैनिक तैनात केले आहेत. भारतामधील सुरक्षा चौक्यांवर चीन ड्रोन्सच्या सहाय्याने नजर ठेवत असल्याची माहितीही समोर आलीय. चीन मोठ्या प्रमाणात ड्रोन्सचा वापर करुन भारतीय सीमेमधील घडामोडींवर नजर ठेऊन असल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
कोणत्या प्रदेशावर आहे चीनची नजर
एएनआयला अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चिनी लष्कराकडून दौलत बेग ओल्डी सेक्टर, गोगरा हाइट्स आणि या परिसराच्या आजूबाजूच्या क्षेत्रांवर नजर ठेवली जात आहे. चीनच्या ड्रोन्सवर भारत बारकाईने नजर ठेऊन आहे. भारताकडून वेगवेगळ्या माध्यमातून चीनच्या या हलचालींवर लक्ष ठेवलं जात आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार भारतीय लष्कराच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे भारताकडूनही मोठ्या प्रमाणात ड्रोन्सचा वापर करुन या सीमेवरील हलचालींवर लक्ष ठेवलं जाणार आहे. लवकरच या कामासाठी इस्त्रायल आणि भारतीय बनावटीच्या ड्रोन्सचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे आता भारत चीन सीमेवर ड्रोन्सच्या माध्यमातून एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. सीमेवरील चीनच्या वाढत्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपत्कालीन संरक्षण निधी वापरण्यासंदर्भातील मागणी संरक्षण दलांनी केल्याचंही सांगितलं जात आहे.
पूर्व लडाखला लागून असलेल्या सीमा भागांमध्ये चीनकडून मोठ्याप्रमाणात मूलभूत सुविधा उभारल्या जात आहेत. थंडीमध्ये या ठिकाणी चिनी सैन्याची व्यवस्था करण्यासाठी कापडी तंबूंऐवजी कायम स्वरुपी घरं आणि विटा सिमेंटचा वापर करुन छावण्या उभारण्यासाठी चीन प्रयत्न करत आहे. उंच भागांमध्ये भारतीय लष्करी जवानांसमोर कमकुवत ठरणाऱ्या चिनी सैन्यांना या सेवांच्या माध्यमातून मनोबल वाढवण्यासाठी सरकारकडून मदत केली जात आहे. भारतीय सीमेवर कुरघोड्या करता याव्यात म्हणून तिबेटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास चीनने सुरुवात केलीय. तिबेटमधील अनेक तरुणांना बळजबरीने लष्करामध्ये सहभागी केलं जात आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर संघर्ष झाल्यास या स्थानिक तरुणांचा वापर युद्धामध्ये करता येईल असा चीनचा विचार आहे.