भारतीय महिला क्रिकेट विश्वाला आनंद देणारी बातमी आहे. महिला क्रिकेटला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करुन देणाऱ्या मिताली राजने क्रिकेट कारकिर्दीमधील १० हजार धावा पूर्ण केल्या आहेत. लखनौमध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात तिने ही ऐतिहासिक कामगिरी केली.
मितालीने १९९९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तिने आतापर्यंत २१२ एकदिवसीय सामन्यात ६ हजार ९७४, तर ८९ टी-२० सामन्यांमध्ये २ हजार ३६४ तर दहा कसोटी सामन्यांमध्ये ६६३ धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात ७ शतके आणि ५४ अर्धशतके तिच्या नावावर आहेत. दहा हजार धावा पूर्ण करणारी ती जगातील दुसरी महिला क्रिकेटपटू आहे. यापूर्वी इंग्लंडच्या शेरलोट एडवर्डसने हिने ही कामगिरी केली आहे. देशभरातील क्रीडा रसिकांकडून मितालीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.