विश्वचषकाच्या रणांगणात रोहित शर्माच्या भारतीय संघाचा सामना आज श्रीलंकेशी होतोय. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. भारतानं विश्वचषकाच्या मोहिमेत आतापर्यंत सहापैकी सहाही सामने जिंकले आहेत. त्यामुळं विश्वचषकाच्या गुणतालिकेत सर्वाधिक 12 गुणांसह भारत दुसऱ्या स्थानी आहे. पण सातव्या स्थानावरच्या श्रीलंकेला सहापैकी केवळ दोनच सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. त्यामुळं विश्वचषकातलं आव्हान टिकवण्यासाठी श्रीलंकेला बलाढ्य भारतीय संघावर विजय मिळवणं आवश्यक आहे. त्यासाठी श्रीलंकेची भिस्त हील प्रामुख्यानं सदीरा समराविक्रमा, पाथुम निसांका आणि कुशल मेंडिस या तीन फलंदाजांवर राहिल. त्या तिघांनीही विश्वचषकात धावांचा रतीब घातला आहे. तसंच दिलशान मधुशंका आणि कासून रजिथा या वेगवान गोलंदाजांचं आक्रमण यशस्वी ठरताना दिसत आहे. पण वानखेडेच्या मैदानावर भारतीय संघाच्या विजयाची शक्यता जास्त आहे. भारताने श्रीलंकेला पराभूत केल्यास सेमीफायनलचे तिटिक मिळणार आहे. हा भारताचा सातवा विजय असू शकतो. सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी भारत फक्त एक विजय दूर आहे.
भारतीय संघाने आतापर्यंत स्पर्धेतील सहाही सामने एकतर्फी जिंकले आहेत. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि इंग्लंडसारख्या तगड्या संघाचा पराभव केलाय. दुसरीकडे श्रीलंका संघाला सहा सामन्यात फक्त दोन विजय मिळवता आलेत. त्यांचे गेल्या काही दिवसांतील कामगिरीही निराशाजनक राहिली आहे. त्यात प्रमुख खेळाडूंना दुखापती झाल्या आहेत. अशा स्थितीत श्रीलंका संघाला विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. दुसरीकडे भारतीय संघाचा आत्मविश्वास अधिक वाढलेला आहे. स्पर्धेतील आतापर्यंतची कामगिरी पाहाता वानखेडेवर भारतीय संघ विजय मिळवेल, असेच प्रत्येकाला वाटत आहे.
आकडे टीम इंडियाच्या बाजूने –
भारत आणि श्रीलंका संघामध्ये आतापर्यंत 167 वनडे सामने झाले आहेत. यामध्ये टीम इंडियाने 98 सामन्यात विजय मिळवलाय. तर श्रीलंकेच्या संघाने 57 सामन्यात बाजी मारली आहे. दोन्ही संघातील 11 सामन्यात कोणताही निकाल लागला नाही. तर एक सामना बरोबरीत सुटला. वनडेतील श्रीलंकेविरोधात भारताची कामगीरी दमदार राहिली आहे. त्यामुळे आज बारतीय संघ विजयाचा दावेदार असेल.
मागील पाच सामन्यातील काय निकाल लागला ?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील मागील पाच सामन्याचा निकाल एकतर्फी लागलाय. पाचही सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. आशिया चषकातही भारताने श्रीलंकेचा दारुण पराभव केला होता.
हेड टू हेड –
वानखेडेवर भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये तीन सामने झाले आहेत. यामध्ये भारताने दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तर श्रीलंकेला फक्त एकदा विजय मिळवता आलाय. दुसरीकडे विश्वचषकात दोन्ही संघ 9 वेळा आमनेसामने आलेत. यामध्ये दोन्ही संघाने प्रत्येकी चार चार विजय मिळवले आहेत.