२ जानेवारी २०२०,
१ जानेवारी २०२० ला जन्म घेतलेल्या बालकांची संख्या जगभरात सर्वाधिक आहे. लोकसंख्येत जगात दुसऱ्या स्थानी असलेल्या भारतात नव वर्षाचे स्वागत होत असताना ६७, ३८५ बालकांनी जन्म घेतला, लोकसंख्येत अव्वल स्थानी असलेल्या चीन मात्र दुसऱ्या स्थानी आहे. १ जानेवारी या दिवशी चीनमध्ये ४६, २२९ बालकांनी जन्म घेतला, तर नायजेरियात २६, ०३९ बालकांनी, पाकिस्तानात १३, ०२० बालकांनी, तर इंडोनेशियात १३,०२० बालकांनी जन्म घेतला. अमेरिकेत या दिवशी १०,४५२ बालकांनी जन्म घेतला.
युनीसेफने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. संपूर्ण जगात १ जानेवारी २०२० साली जन्म घेतलेल्या बालकांची संख्या विचारात घेतल्यास भारतात जन्माला आलेल्या बालकांची संख्या १७ टक्के इतकी आहे.नव्या वर्षाचे स्वागत होत असताना जगात पहिल्या बालकाचा जन्म फिजी देशात झाला. तसेच, १ जानेवारीला शेवटच्या जन्माची अमेरिकेच्या नावे नोंद झाली आहे. जगातील बालकांच्या कल्याणासाठी तसेच विकासासाठी जागतिक स्तरावर काम करणाऱ्या युनिसेफने १ जानेवारी या दिवशी जन्माला आलेल्या बालकांसाठी स्वागताचा कार्यक्रम आयोजित करत शुभेच्छा दिल्या.
भारताची राजधानी असलेल्या नवी दिल्लीतही काही मुलांचा जन्म झाला. आपल्या मुलाचा १ जानेवारी याच दिवशी जन्म व्हावा यासाठी सिझेरियनद्वारे अनेक महिलांनी बालकांना जन्म दिला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. आपल्या बाळाचा जन्म १ जानेवारी या दिवशी व्हावा हे अनेकांना विशेष असल्याचे वाटते, असेही डॉक्टर म्हणाले.