महिलांच्या भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यात सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर लिझेली ली हिने दमदार शतकी खेळी करत विजय मिळविला. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे सहा धावांनी विजय साकारत पाच सामन्यांच्या या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.
भारताचे २४९ धावांचे आव्हान पार करताना लिझेली हिने १३१ चेंडूंत १६ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद १३२ धावांची खेळी केली. ४६.३ षटकांत ४ बाद २२३ अशी पाहुण्यांची स्थिती असताना पावसाने हजेरी लावली. अखेर डकवर्थ-लुईस नियमांच्या आधारे आफ्रिकेला विजयी घोषित करण्यात आले.
पूनम राऊत हिने साकारलेल्या सलग दुसऱ्या अर्धशतकी खेळीमुळे भारताला ५० षटकांत ५ बाद २४८ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. पूनमने भारताकडून सर्वाधिक ७७ धावांची खेळी केली. कर्णधार मिताली राज, हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी ३६ धावा फटकावल्या. सलामीवीर जेमिमा रॉड्रिग्ज (०) हिला छाप पाडता आली नाही. स्मृती मानधनाही मोठी खेळी करू शकली नाही. भारताकडून वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिने दोन बळी मिळवले.
संक्षिप्त धावफलक भारत : ५० षटकांत ५ बाद २४८ (पूनम राऊत ७७, हरमनप्रीत कौर ३६, मिताली राज ३६; शबरिम इस्माइल २/४६)
दक्षिण आफ्रिका : ४६.३ षटकांत ४ बाद २२३ (लिझेली ली नाबाद १३२, मिगनॉन डू प्रीझ ३७; झुलन गोस्वामी २/२०).