रोहित शर्माचा संयम, विराटचा झोकून देणारा खेळ आणि बुमराहच्या गोलंदाजीतील कलात्मकता यामुळे आज, शनिवारी रंगणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या वनडे वर्ल्ड कप लढतीत भारताचे पारडे जड आहे. गेल्या दोन सामन्यांतील कामगिरी, त्याआधीचा मालिकाविजय यामुळे भारतीय संघ फेव्हरेट असणे सहाजिकच आहे. अर्थात पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदीच्या पहिल्या स्पेलला भारतीय संघ कसा सामोरा जातो, यावर भारताची सामन्यातील पुढील वाटचाल अवलंबून असेल.
या सामन्याला सामाजिक आणि राजकीय संदर्भ असल्याने क्रिकेटच्या २२ यार्डाच्या खेळपट्टीवरही याचा प्रभाव जाणवेल. भारतीय संघ कागदावर मजबूत संघ दिसत आहे आणि फलंदाजी फळीत तारांकितांचा भरणा आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या दृष्टीने वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचा पहिला ‘स्पेल’ संघासाठी निर्णायक ठरेल.
आक्रमक सुरुवातीची अपेक्षा
भारतीय कर्णधार रोहित शर्मा एक लाख ३२ हजार चाहत्यांसमोर शाहीनविरुद्ध आक्रमक खेळ करण्याच्या प्रयत्नात असेल. शुभमन गिल डेंग्यूतून सावरला असला, तरी त्याला या सामन्यात संधी मिळते का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
भारतीय संघाची घडी छान बसली आहे; पण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात एका प्रश्नाचे उत्तर शोधणे भाग आहे. रविचंद्रन अश्विनला खेळवायचे की शार्दूल ठाकूरला संधी द्यायची? हे दोघेही आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येतात. खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल असेल, तर शार्दूल योग्य पर्याय ठरेल. मात्र चेंडू थोडा थांबून बॅटवर येणार असेल तर अश्विनला निवडणे व्यवहार्य ठरेल.