Thursday, September 28, 2023
Homeआंतरराष्ट्रीयअखेरच्या टी-२० सामन्यात भारत पराभूत ,१२ धावांनी ऑस्ट्रेलिया विजयी

अखेरच्या टी-२० सामन्यात भारत पराभूत ,१२ धावांनी ऑस्ट्रेलिया विजयी

८ डिसेंबर २०२०,
अखेरच्या टी-२० सामन्यात भारतीय फलंदाजीचं मोठं आव्हान परतवून लावण्यात ऑस्ट्रेलियाला यश आलं आहे. तिसऱ्या टी-२० सामन्यात १२ धावांनी बाजी मारत कांगारुंनी टी-२० मालिकेचा शेवट गोड केला आहे. १८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार विराट कोहलीने ८५ धावांची आक्रमक खेळी केली. परंतू दुसऱ्या बाजूने इतर फलंदाजांची साथ न लाभल्याने भारताला पराभवाचा सामना करावा लागला. अखेरचा सामना भारताने गमावला असला तरीही टी-२० मालिकेत २-१ ने बाजी मारण्यात भारत यशस्वी ठरलाय.

१८७ धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. ग्लेन मॅक्सवेल टाकत असलेल्या पहिल्याच षटकात लोकेश राहुल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात माघारी परतला. यानंतर शिखर धवन आणि विराट कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. विराटने आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजी करत धावांचा ओघ वाढवण्यास सुरुवात केली. ही जोडी भारताचा डाव सावरणार असं वाटत असतानाच स्वेप्सनने शिखर धवनला माघारी धाडलं. यानंतर संजू सॅमसननेही तिसऱ्या सामन्यात निराशाजनक खेळ करत आपली विकेट फेकली.

दुसरीकडे विराटने एक बाजू लावून धरत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. सॅमसन माघारी परतल्यानंतर मैदानावर आलेला श्रेयस अय्यरही शून्यावर बाद झाला. यानंतर विराटने हार्दिक पांड्याच्या साथीने फटकेबाजी करत भारताचं आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न केला. डॅनिअल सम्सच्या गोलंदाजीवर सुरेख फटकेबाजी करत विराटने सामन्यात रंगत आणली. यानंतर हार्दिक पांड्यानेही रंगात येत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरुवात केली. परंतू कर्णधार फिंचने आपला हक्काचा फिरकीपटू झॅम्पाला पाचारण केलं, आणि १८ व्या षटकात पांड्याचा बळी घेत झॅम्पानेही कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. १९ व्या षटकात अँड्रू टायने विराटला माघारी धाडत भारताच्या उरल्यासुरल्या आशांवर पाणी फिरवलं.

त्याआधी,यष्टीरक्षक मॅथ्यू वेड आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी झळकावलेल्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने अखेरच्या टी-२० सामन्यात १८६ धावांचा डोंगर उभा केला. भारतीय क्षेत्ररक्षकांनी तिसऱ्या टी-२० त अतिशय खराब कामगिरी करत सोपे झेल सोडले, ज्याचा फायदा ऑस्ट्रेलियाला मिळाला. वेड आणि मॅक्सवेल जोडीने भारतीय गोलंदाजांची धुलाई करत मैदानात चौफेर फटकेबाजी केली. वेडने ८० तर मॅक्सवेलने ५४ धावांची खेळी केली. नाणेफेक जिंकत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत सुरुवातीच्या षटकांमध्ये भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर अंकुश लावला. पुनरागमन करणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंच सुंदरच्या गोलंदाजीवर भोपळाही न फोडता माघारी परतला. यानंतर मॅथ्यू वेड आणि स्टिव्ह स्मिथ यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. ही जोडी ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारुन देणार असं वाटत असतानाच सुंदरने स्टिव्ह स्मिथचा त्रिफळा उडवत भारताला दुसरं यश मिळवून दिलं, स्मिथने २४ धावा केल्या.

दुसऱ्या बाजूने मॅथ्यू वेडने आपली फटकेबाजी सुरु ठेवत अर्धशतक झळकावलं. मैदानात जम बसल्यानंतर भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत वेडने सिडनीच्या मैदानावर चौफर फटकेबाजी केली. ग्लेन मॅक्सवेलनेही आपल्याला मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेत काही सुरेख फटके खेळले. वेड आणि मॅक्सवेल जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी केली. दरम्यान शार्दुल ठाकूरने वेडला तर नटराजनने मॅक्सवेलला माघारी धाडत कांगारुंची जोडी फोडली. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने २ तर नटराजन आणि शार्दुलने १-१ बळी घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments