भारतीय नौकानयन खेळांसाठी गुरूवारचा दिवस ऐतिहासिक क्षण होता. भारतीय नौकानयनपटू विष्णू सारावानन तसेच गणपती चेंगाप्पा आणि वरुण ठक्कर ही जोडी ओमान येथे सुरू असलेल्या आशियाई नौकानयन पात्रता स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करत टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहे.
भारताच्या तब्बल चार नौकानयनपटूंनी ऑलिम्पिकसाठी स्थान मिळवण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. नेत्रा कुमानन हिने बुधवारी लेझर रेडियल प्रकारात ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवले होते.
स्पर्धेच्या अखेरच्या दिवसाआधी विष्णू तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र गुरुवारी त्याने थायलंडच्या किराती बुआलाँग याचा पराभव करत एकूण दुसरे स्थान पटकावत टोक्यो ऑलिम्पिकची पात्रता मिळवली. त्यानंतर चेंगाप्पा आणि ठक्कर या डोडीने ४९ईआर क्लास प्रकारात गुणतालिकेत सर्वोत्तम स्थान पटकावत ऑलिम्पिकचे स्थान प्राप्त केले. या दोघांनी इंडोनेशिया येथे झालेल्या २०१८ आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती.
‘‘नौकानयनपटू, पालक आणि प्रशिक्षकांनी इतक्या वर्षांपासून घेतलेल्या मेहनतीचे चीज झाले,’’ असे भारताचे प्रशिक्षक टोमास्झ जानूझेवस्की यांनी ओमानहून सांगितले.
नेत्री कुमानन, विष्णू सारावानन तसेच केसी गणपती आणि वरुण ठक्कर या चौघांचेही टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्याबद्दल अभिनंदन. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली पहिली महिला नौकानयनपटू ठरलेल्या नेत्राचे विशेष अभिनंदन. भारताचे खेळाडू सर्व क्रीडाप्रकारात चमकत आहे, हे नक्कीच नमूद करावे लागेल, असे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी अभिनंदन केले.
तीन विविध प्रकारात भारताचे चौर नौकानयनपटू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. भारतीय नौकानयन खेळाच्या इतिहासात एका नव्या अध्यायाची नोंद झाली आहे. भारतीय नौकानयन खेळाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्याबद्दल सर्वांचे आभार. भारतीय नौकानयन असोसिएशनचे उपसरचिटणीस कॅप्टन जितेंद्र दीक्षित यांनी शुभेच्छा दिल्या.