Friday, September 29, 2023
Homeआंतरराष्ट्रीयअखेरच्या वन-डे सामन्यांत ऑस्ट्रेलियाचं आव्हान मोडीत काढत भारताची बाजी,१३ धावांनी विजय

अखेरच्या वन-डे सामन्यांत ऑस्ट्रेलियाचं आव्हान मोडीत काढत भारताची बाजी,१३ धावांनी विजय

अखेरच्या वन-डे सामन्यांत ऑस्ट्रेलियाचं आव्हान मोडीत काढत भारताची बाजी,१३ धावांनी विजय
२ डिसेंबर २०२०,
अंतिम सामन्यात १३ धावांनी बाजी मारत भारतीय संघाने व्हाईटवॉशची नामुष्की टाळली आहे. ऑस्ट्रेलियाकडून फिंच, मॅक्सवेल यांनी फटकेबाजी करत चांगली झुंज दिली, परंतू मोक्याच्या क्षणी भारतीय गोलंदाज वरचढ ठरले.शार्दुल ठाकूर, टी. नटराजन, जसप्रीत बुमराह यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाने अखेरच्या वन-डे सामन्यांत ऑस्ट्रेलियाचं आव्हान मोडीत काढत बाजी मारली आहे.

वॉर्नरच्या अनुपस्थितीत सलामीला बढती मिळालेला लाबुशेन नटराजनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. ३०३ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली.यानंतर शार्दुल ठाकूरने स्टिव्ह स्मिथला माघारी धाडत कांगारुंची मैदानावर जम बसू पाहत असलेली जोडी फोडली. दोन सामन्यांत शतक झळकावणारा स्मिथ अखेरच्या वन-डेत ७ धावां काढून माघारी परतला. यानंतर हेन्रिकेज आणि फिंच यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. यात दोघांना यश येतंय असं दिसत असतानाच विराटने पुन्हा एकदा शार्दुल ठाकूरकडे चेंडू दिला. शार्दुलनेही आपल्या कर्णधाराला निराश न करता हेन्रिकेजला माघारी धाडत टीम इंडियाला महत्वाचा बळी मिळवून दिला.

दरम्यान एक बाजू सांभाळून असलेल्या फिंचने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करत फिंचने ८२ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ७५ धावांची खेळी केली. जाडेजाने फिंचला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाच्या अडचणींमध्ये भर टाकली. यानंतर युवा कॅमरुन ग्रीनही फारशी चमक दाखवू शकला नाही. यादरम्यान सामन्यावर भारताचं वर्चस्व होतं. परंतू ग्लेन मॅक्सवेलने आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करत मैदानात चौफर फटकेबाजी केली. भारतीय गोलंदाजांची धुलाई करत मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाचं आव्हान कायम राखलं. ३८ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह मॅक्सवेलने ५९ धावा केल्यानंतर बुमराहने त्याचा त्रिफळा उडवला. यानंतर ४७ व्या षटकांत अबॉटला माघारी धाडत शार्दुलने भारताला आणखी एक यश मिळवून दिलं. यानंतर कांगारुंचे फलंदाज तग धरु शकले नाहीत. भारताकडून शार्दुल ठाकूरने ३, टी. नटराजन, जसप्रीत बुमराहने २ तर कुलदीप आणि जाडेजा यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

त्याआधी, हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा यांच्यातील शतकी भागीदारी आणि कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर तिसऱ्या वन-डे सामन्यात भारतीय संघाने ३०२ अशा आश्वासक धावसंख्येपर्यंत मजल मारली. व्हाईवटॉश टाळण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने अखेरच्या वन-डे सामन्यासाठी ४ बदल केले, परंतू आघाडीच्या फळीतल्या फलंदाजांच्या खराब कामगिरीचं सत्र या सामन्यातही सुरुच राहिलं. विराट आणि पांड्याने संयमी खेळ करत भारताची अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेतली. अखेरच्या षटकांमध्ये कांगारुंची धुलाई करत पांड्या-जाडेजा जोडीने भारताला दमदार पुनरागमन करुन दिलं. पांड्याने नाबाद ९२ तर जाडेजाने नाबाद ६६ धावा केल्या.

मयांक अग्रवालच्या अनुपस्थितीत युवा शुबमन गिल शिखर धवनच्या सोबतीला सलामीसाठी आला. आश्वासक सुरुवात केल्यानंतर शिखर धवन शेन अबॉटच्या गोलंदाजीवर सोपा झेल देऊन माघारी परतला. यानंतर कर्णधार विराटने शुबमन गिलच्या साथीने महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. गिलने यादरम्यान काही सुरेख फटके खेळले. फिरकीपटू अॅगरने गिलला माघारी धाडत भारताला मोठा धक्का दिला. यानंतर श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुलही फारशी चमक न दाखवता माघारी परतले. एककीकडे इतर फलंदाज माघारी परतत असताना विराट कोहलीने एक बाजू लावून धरली होती. आपलं अर्धशतक झळकावत विराटने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा नेटाने सामना केला. परंतू जोश हेजलवूडने विराटला माघारी धाडत भारताला आणखी एक धक्का दिला, त्याने ६३ धावांची खेळी केली. यानंतर हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा जोडीने पुन्हा एकदा संयमी खेळ करत महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. हार्दिकने फटकेबाजी करत आपलं अर्धशतक झळकावलं. रविंद्र जाडेजानेही त्याला उत्तम साथ दिली. ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू अॅगरने २ तर हेजलवूड-झॅम्पा आणि अबॉटने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments