कसोटी कारकीर्दीतील २०० बळींचा टप्पा गाठणाऱ्या मोहम्मद शमीसह (५/४४) भारताच्या वेगवान चौकडीने केलेल्या प्रभावी माऱ्यापुढे दक्षिण आफ्रिकेची त्रेधातिरपीट उडाली. त्यामुळे पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताने वर्चस्व प्रस्थापित करताना तिसऱ्या दिवसअखेर एकूण १४६ धावांची आघाडी मिळवली.
सेंच्युरिअन येथे सुरू असलेल्या या कसोटीत भारताने दुसऱ्या डावात १ बाद १६ धावा केल्या असून सलामीवीर के. एल राहुल ५, तर ‘नाइट वॉचमन’ म्हणून आलेला शार्दूल ठाकूर ४ धावांवर खेळत आहे. मयांक अगरवाल (४) दुसऱ्या डावात स्वस्तात माघारी परतला. मात्र सामन्याचे दोन दिवस अद्याप शिल्लक असल्याने भारताने विजयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासून आफ्रिकेच्या फलंदाजांवर दडपण टाकले. शमीने एडिन मार्करम (१३), कीगन पीटरसन (१५), ऱ्हासी व्हॅन डर दुसेन (३) यांचे बळी मिळवले. कर्णधार तेम्बा बव्हुमा (५२) आणि िक्वटन डीकॉक (३४) यांनी पाचव्या गडय़ासाठी ७२ धावांची भर घालून आफ्रिकेला सावरण्याचा प्रयत्न केला. शमीनेच बव्हुमाला बाद करून ही जोडी फोडली. आफ्रिकेचा डाव ६२.३ षटकांत १९७ धावांवर संपुष्टात आला. जसप्रीत बुमरा, शार्दूल ठाकूर यांनी दोन, तर मोहम्मद सिराजने एक बळी मिळवला.
तत्पूर्वी, पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ वाया गेल्यानंतर रविवारच्या ३ बाद २७२ धावांवरून भारताने तिसऱ्या दिवसाच्या खेळाला प्रारंभ केला. परंतु शतकवीर के. एल. राहुल (१२३) आणि अजिंक्य रहाणे (४८) यांची जोडी रबाडाने फोडल्यावर भारताची फलंदाजी ढेपाळली. ऋषभ पंत (८), रविचंद्रन अश्विन (४), शार्दूल ठाकूर (४) फार काळ टिकू शकले नाहीत. त्यामुळे भारताचा पहिला डाव ३२७ धावांवर आटोपला. आफ्रिकेकडून लुंगी एन्गिडीने सहा बळी मिळवले.