मुंबईत आज प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्याविरोधात आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. आयकर विभागाच्या पथकांनी अनुराग कश्यप आणि तापसीच्या मुंबईतील मालमत्तांवर छापे टाकत झाडाझडती सुरू केली आहे. तसेच विकास बहल आणि मधु मंटेना यांच्या घरीही आयकरने छापे टाकल्याची माहिती मिळत आहे.
आयकर विभागातर्फे बुधवारी दुपारी ‘फँटम फिल्म’शी संबंधित लोकांच्या घरांवर या धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मधू मंटेना यांची कंपनी ‘क्वान’ यांच्या कार्यालयावरही छापे मारण्यात आले. कर चुकवल्याच्या आरोपाखाली मुंबईतील तब्बल २२ ठिकाणांची झाडाझडती आयकर विभागाकडून घेतली जात आहे. यात फँटम प्रोडक्शन हाऊसशी संबंधित अनुराग कश्यप, तापसी पन्नू, विकास बहल आणि मधू मंटेना यांच्या मालमत्तावर आयकरने धाड टाकली.
‘फँटम फिल्म’ आणि क्वान या कंपन्यांनी कर चोरी केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं आयकर विभागानं म्हटलं आहे. या कर चोरी प्रकरणाचा तपास सुरू असल्याचंही आयकरनं म्हटलं आहे. फँटम फिल्म्स चित्रपट निर्मिती आणि त्याचं वितरण करण्याचं काम करते.