९ ऑक्टोबर २०२१,
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर धाडी मारण्यात आल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून आयकर विभागाने हे धाडसत्रं सुरू केलं आहे. त्यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एखाद्या व्यक्तीच्या घरी चौकशी करणं ठिक, पण नातेवाईकांच्या घरी जाणं हे काही बरोबर नाही, असं दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटलं आहे.
दिलीप वळसे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केंद्र सरकार त्यांच्याकडे असलेल्या एजन्सी आणि सत्तेचा वापर राजकीय कारणासाठी करत आहेत. या पूर्वीच्या काळात राजकारणात कधीही अशी परिस्थिती पाहिली नव्हती. एखाद्याच्या घरी चौकशी करणं ठीक आहे. परंतु सगळ्या नातेवाईकांच्या घरी जाणं आणि त्यांना त्रास देणं हे बरं नाही, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.
अजितदादांच्या तीन बहिणींच्या घरी छापेमारी
अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरी आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या कारखान्यावर सलग तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून छापेमारी सुरु आहे. अजित पवारांच्या 3 बहिणींमध्ये कोल्हापुरातील विजया पाटील, तर पुण्यातील नीता पाटील आणि रजनी इंदूलकर यांचा समावेश आहे.
अहमदनगर
सलग तिसऱ्या दिवशी अजित पवार यांच्या अंबालिका शुगर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आयकर विभागाचे पथक दाखल झालं. इथेही तीन दिवसांपासून आयकर विभागाकडून तपासणी सुरू आहे.
दौंड (पुणे)
तिसऱ्या दिवशीही ‘दौंड शुगर’ या साखर कारखान्यावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनाकडून तपासणी सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे आयकर विभागाकडून कसून तपासणी.
पुणे
अजित पवारांच्या बहिणी डॉ. रजनी इंदुलकर यांच्यासह नीता पाटील यांच्या घरीही सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. मोदीबागेत नीता पाटील यांचे घर आहे. याच इमारतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील राहतात.
अजित पवारांशी संबंधित कारखान्यांवरही धाडसत्र..
अजित पवारांच्या 3 बहिणींबरोबरच, 4 साखर कारखान्यांतील कागदपत्रांची छाननी आयकर विभागाकडून केली जातेय. यात साताऱ्यातला जरंडेश्वर साखर कारखाना, नंदुरबारमधला पुष्पदंतेश्वर साखर कारखाना, अहमदनगरमधला अंबालिका, तर पुण्यातील दौंड शुगर साखर कारखान्याचा समावेश आहे. आयकर विभागाची पहिली नजर अजित पवारांशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्यावरच पडली. सलग दुसऱ्या दिवशी आयकरच्या अधिकाऱ्यांकडून जरंडेश्वर कारखान्यात कारवाई सुरु आहे.
अजित पवार औरंगाबाद दौऱ्यावर..
उपमुख्यमंत्री अजित पवार आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. सायंकाळी चार वाजता ते औरंगाबादेत दाखल होतील. अजित पवार एक दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर असतील. ते विभागीय आयुक्त कार्यालयात अतिवृष्टीच्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. शेतकऱ्यांना मदत देण्याच्या दृष्टीने अतिवृष्टीच्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात जवळपास दीड तास आढावा बैठकीचं नियोजन आहे.