शहरात फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. पिंपरी चिंचवडमधील वाकडमध्ये शेअर मार्केटमध्ये पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये तब्बल ३७ जणांची फसवणूक करण्यात आली आहे.पिंपळे सौदागर येथे १ सप्टेंबर २०२१ ते २७ जानेवारी २०२२ या कालावधीत ही घटना घडली आहे. आरोपीनी नागरिकांची जवळपास आठ कोटी २९ लाख ७५ हजार ८०३ रुपयांची फसवणूक केली आहे. महेश मुरलीधर शिंदे (वय ४४ रा., भोसरी) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी आतापर्यंत सागर संजय जगदाळे (वय २८, रा. रावेत) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यासह जय मावजी, निजय मेहता, निकुंज शहा, नीलेश शांताराम वाणी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा या घटनेचा तपास करत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महेश शिंदे हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची ओळख आरोपीच्या सोबत झाली. त्यावेळी आरोपीनी . इन्फिनॉक्स कॅपिटल कंपनीच्या शेअर ट्रेडींग ब्रोकर कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. इथे गुंतवणूक केल्यावर तुम्हाला दुप्पट -तिप्पट पपैसे मिळतील. आरोपीच्या बोलण्याला भुलून फिर्यादीने त्यामध्ये पैसे गुंतवले. मात्र आरोपीनी फिर्यादीला कोणत्याही प्रकारची रक्कम पार्ट दिली नाही. या उलट कंपनीच्या मेटा ट्रेडर फोर या ऍपवर बनावट व खोटा इलेक्ट्रानिक अभिलेख तयार करून फिर्यादीसह व इतरांची आठ कोटी २९ लाख ७५ हजार ८०३ रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
मुद्देमाल केला हस्तगत
कारवाई दरम्यान पोलिसांच्या लक्षात आले कि इन्फिनॉक्स कॅपिटल कंपनीचे रावेत येथे कार्यालय आहे . त्या कार्यालयाचा तपासणी केली असता टॅब, दोन मोबाईल, बॅक पासबुक, बॅक चेकबुक व इतर कागदपत्रे त्याच्याकडे मिळून आले, याबरोबरच १० रुपयाच्या बनावट नोटाही हस्तगत करण्यात आल्या. या घटनेतील मुख्य सागर जगदाळे असल्याचे समोर आले आहे.सागर आरोपींसोबत मोबाइल व इलेक्ट्रॉनिक माध्यमाव्दारे संपर्कात असल्याचे समोर आले.या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.