महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या रायफल शूटिंग व पिस्तूल शूटिंग केंद्राचे उद्घाटन दि. १६ ऑगस्ट रोजी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते पार पडले.
रायफल शूटिंग व पिस्तूल शूटिंग या खेळामध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावेत यासाठी महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ‘ग’ प्रभाग मधील थेरगाव येथील महापालिकेच्या माध्यमिक विद्यालयात रायफल शूटिंग व पिस्तूल शूटिंग केंद्र सुरु करण्यात आले आहे. याचे उद्घाटन आयुक्त पाटील यांच्या हस्ते पार पडले. या उद्घाटन प्रसंगी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपआयुक अजय चारठाणकर, चंद्रकांत इंदलकर, ‘ग’ क्षेत्रीय अधिकारी विनोद जळक, समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे यांच्यासह प्रभाग प्रशासन अधिकारी जगताप, महापालिकेच्या थेरगाव माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, रायफल शूटिंग राष्ट्रीय प्रशिक्षक विजय रणझुंजारे, राष्ट्रीय पिस्तूल खेळाडू गीतांजली रणझुंजारे, राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावर कबड्डी खेळणारे खेळाडू, मार्गदर्शक आटवे, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष पवार आर.एस., प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष तसेच इतर कर्मचारी वर्ग आणि नागरिक उपस्थित होते.
यावेळी थेरगावच्या माध्यमिक विद्यालयामध्ये क्रीडा विभागामध्ये सुरू असलेल्या उपक्रमांचे आयुक्त पाटील यांनी कौतुक केले. या केंद्रातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावेत यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या प्रशिक्षकांचे अभिनंदन केले. महापालिकेतील शाळेत शिक्षण घेणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांनी जिद्दीने आणि चिकाटीने अभ्यास करून पिंपरी चिंचवड शहराचे उज्वल करा असे बोलून त्यांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामेश्वर पवार यांनी केले