Monday, July 15, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गहुंजे क्रिकेट मैदान परिसराला छावणीचे स्वरूप

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गहुंजे क्रिकेट मैदान परिसराला छावणीचे स्वरूप

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हा सामना हाऊसफुल्ल असल्याचे सांगितले जात आहे. मराठा आरक्षण आंदोलनाला ठिकठिकाणी मिळत असलेल्या हिंसक वळणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या सामन्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला असून, सामन्याच्या पूर्वसंध्येला परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

विश्वचषक स्पर्धेची तीव्रता आणि राज्यात मराठा आरक्षणाची तीव्रता वाढली असल्याने आंदोलक आपला मोर्चा या सामन्याकडे वळवू शकतात याची भीती लक्षात घेऊन पोलिसांनी जवळपास मैदानाच्या जवळचा सगळाच परिसर ताब्यात घेतला आहे. सामना दुपारी दोन वाजता होणार असून, मैदानाचे दरवाजे प्रेक्षकांसाठी दुपारी १२.३० वाजता उघडले जाणार आहेत. सामना दोन तगड्या संघांत असल्यामुळे सामन्याची सर्व तिकिटे संपली आहेत. अशा वेळी मोठी गर्दी होणार यात शंका नाही. त्यामुळे तिकीटधारकांनी लवकरात लवकर वेळेत मैदानावर पोहचावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दुपारपर्यंत या आंदोलनाची झळ ठिकठिकाणी पोचत असल्यामुळे संध्याकाळनंतर पोलिसांनी संपूर्ण मैदान ताब्यात घेतले असून, सर्व दरवाजे बंद करण्यात आले आहेत. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस परिस्थिती हाताळत असल्याचे सांगितले.

वाहतुकीच्या नियोजनासाठी एक पोलीस उपायुक्त, मैदान परिसरातील सुरक्षिततेसाठी एक पोलीस उपायुक्त, तीन सहायक पोलीस आयुक्त, २५ पोलीस निरीक्षक, ७० सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, ८०० अंमलदार, एसआरपीच्या तीन टीम असणार आहेत. या पोलीस बंदोबस्तामुळे मैदानाला छावणीचे स्वरूप आले आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क आहे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments