२३ जानेवारी २०२१,
तामिळनाडूत काही उपद्रवींनी मुक्या प्राण्याचा जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. नीलगिरी जिल्ह्यात काही लोकांनी एका हत्तीच्या अंगावर जळता टायर फेकला.यात होरपळून हत्तीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. वन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हत्ती ४० वर्षांचा होता. त्याचा होरपळल्याने मृत्यू झाला.
मसिनागुडीच्या खासगी रिसॉर्टजवळ काही लोकांनी हत्तीवर जळता टायर फेकला. त्यामुळे त्याचा कान आणि डोक्याचा काही भाग जळाला. हत्तीला मेडिकल केअर फॅसिलिटीत घेऊन जात असताना, त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याआधारे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.
प्रसात आणि रेमंड डीन अशी दोघांची नावे आहेत. याशिवाय रिकी रायन नावाचा तरुणही या घटनेत सामील असल्याचे समजते. तिसरा आरोपी फरार आहे. दोघांना शुक्रवारी अटक करण्यात आली असून, त्यांची रवानगी कोठडीत करण्यात येणार आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. गेल्या वर्षी कोइम्बतूरमधील एका गावात १५ वर्षीय हत्तीचा शेतात शॉक लागून मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले होते.