Sunday, June 15, 2025
Homeगुन्हेगारीपंजाब मध्ये आंदोलकांनी रस्ता अडवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा अडकून पडला; दौरा...

पंजाब मध्ये आंदोलकांनी रस्ता अडवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा अडकून पडला; दौरा रद्द करून पंतप्रधान परत गेले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षा व्यवस्थेच्या बाबतीत गंभीर चूक झाल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. फिरोजपूर येथे पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे भूमिपूजन होणार होते. त्यासाठी पंतप्रधान पंजाबमध्ये दाखलही झाले होते. मात्र अचानक दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान माघारी परतले. पाऊस आणि खराब हवामान यामुळे पंतप्रधानांनी फिरोजपूर दौरा रद्द केला असे प्रथम सांगितले जात होते. मात्र, आता केंद्रीय गृहमंत्रालयाकडून याबाबत नेमकी माहिती देण्यात आली असून सुरक्षा व्यवस्थेच्या कारणास्तव पंतप्रधानांचा दौरा रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘पंतप्रधान मोदी आज आपल्या नियोजित फिरोजपूर दौऱ्यासाठी रवाना झाले. बठिंडा येथे दाखल झाल्यानंतर सर्वप्रथम ते हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारक येथे जाऊन अभिवादन करणार होते. तिथे हेलिकॉप्टरने जाण्याचे नियोजन होते. मात्र परिसरात पाऊस असल्याने व कमी दृष्यमानता असल्याने पेच निर्माण झाला. साधारण वीस मिनिटे तिथे पंतप्रधानांनी प्रतीक्षा केली. त्यानंतर रस्तेमार्गाने हुसैनीवाला येथे जाण्याचा निर्णय घेण्यात आला. रस्त्याने साधारण दोन तासांचे हे अंतर होते. या अनुषंगाने सुरक्षा व्यवस्था ठेवण्याबाबत लगेचच पंजाबच्या पोलीस महासंचालकांना अवगत करण्यात आले. पंतप्रधान हुसैनीवाला येथे जाण्यास निघाल्यानंतर शहीद स्मारकाच्या सुमारे ३० किलोमीटर अलीकडे पंतप्रधानांचा ताफा थांबवावा लागला. तेथील एका उड्डाणपुलाजवळ १५ ते २० मिनिटे पंतप्रधानांचा ताफा एकाच ठिकाणी थांबून होता. काही निदर्शकांनी रस्ता रोखल्याचे आढळून आले. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील ही गंभीर चूक लक्षात घेत तातडीने तिथून बठिंडा येथे परतण्याचा निर्णय घेण्यात आला’, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने नमूद केले आहे.

चन्नी यांनी आरोप फेटाळला

पंतप्रधानांच्या दौऱ्याला काही शेतकरी संघटनांचा विरोध होता. हुसैनीवालाकडे जाणाऱ्या मार्गावर आज शेतकऱ्यांकडून निदर्शने करण्यात आली. शेतकऱ्यांनी रस्ता रोखून धरला. त्यातच पंतप्रधानांचा ताफा अडकला अशी माहिती मिळत आहे. शेतकऱ्यांनी रस्ता रोखल्याचे माहीत असून पंजाब पोलिसांनी त्याबाबत एसपीजीला कल्पना दिली नाही. त्यामुळेच पंतप्रधानांना माघारी फिरावे लागले, अशी बाबही आता समोर येत असून त्यावरून मोठं वादळ उठलं आहे. याप्रकरणी भाजपने पंजाब सरकारला फटकारले असून पंतप्रधानांना पुरेशी सुरक्षा पुरवू न शकणाऱ्या मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीच भाजप प्रदेशाध्यक्ष अश्विनी शर्मा यांनी केली आहे. मात्र चन्नी यांनी आरोप फेटाळले आहेत. पंतप्रधान हवाईमार्गे येणार होते. मात्र आम्हाला कोणतीही कल्पना न देता त्यात बदल करण्यात आला. त्यामुळे ही सुरक्षेतील चूक म्हणता येणार नाही, असे चन्नी म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments