Saturday, November 2, 2024
Homeमहाराष्ट्रउद्योगाच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाच्या असलेल्या पुणे जिल्ह्यात पायाभूत सुविधांकडे मात्र लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

उद्योगाच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाच्या असलेल्या पुणे जिल्ह्यात पायाभूत सुविधांकडे मात्र लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

देशातील प्रमुख औद्योगिक उत्पादन केंद्र, माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र असा नावलौकिक असलेल्या पुण्यात उद्योगांना पूरक अशा अनेक पायाभूत सुविधा अद्याप उभारणीच्या प्रतीक्षेत आहेत. उद्योगाच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाच्या असलेल्या या जिल्ह्यात अद्याप स्वतंत्र आंतरराष्ट्रीय विमानतळ उभे राहू शकलेले नाही, अशी अवस्था आहे. राज्यकर्त्यांनी आता घोषणांच्या पलीकडे जाऊन उद्योगांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष द्यावे, अशी उद्योग क्षेत्राची मागणी आहे.

पुण्याचे भौगोलिक स्थान अतिशय महत्त्वाचे असून, पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी पुणे हे जवळचे मोठे केंद्र ठरते. त्यामुळे पुण्यात होणारी गुंतवणूकही मोठी आहे. रोजगाराच्या निमित्ताने पुण्यात होणारे स्थलांतरही अधिक आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रातून पुन्हा एकदा दीर्घ काळ प्रलंबित असलेल्या मागण्या तडीस लावण्याचा सूर उमटू लागला आहे. अनेक उमेदवारांकडून या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दलही उद्योग क्षेत्रात नाराजी आहे.

पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव, रांजणगाव, बारामती, भिगवण, इंदापूर, जेजुरी, कुरकुंभ, खेड या औद्योगिक वसाहतींसह हिंजवडी आयटी पार्क आणि खराडी नॉलेज पार्क आहे. यात औद्योगिक उत्पादनांपासून माहिती तंत्रज्ञान उद्योगांचा समावेश आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होत आहे. प्रत्यक्षात या औद्योगिक वसाहती पाहिल्यास तेथे रस्त्यांपासून पायाभूत सुविधांपर्यंत सगळ्याचीच दुरवस्था झाली आहे. त्याकडे स्थानिक प्रशासन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांच्यासह लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत आहे.

लघु व मध्यम उद्योगांचा विचार करता सर्वांत जास्त नोंदणीकृत उद्योग पुण्यात आहेत. पुण्यातील उद्योगांच्या पुरवठा साखळीत हे लघु व मध्यम उद्योग महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. तसेच, त्यांच्याकडून होणारी निर्यातही मोठी आहे. असे असताना उद्योगांच्या वाढीसाठी ठोस पावले उचलली जाताना दिसत नाहीत, अशी खंतही उद्योजक व्यक्त करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments