महाविकास आघाडीमधील १९ नगरसेवक भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला. महाविकास आघाडीच्या हाती काही नाही. त्यामुळेच त्यांचे नगरसेवक भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत, असे मुळीक यांनी सांगितले. कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात नियोजनासंदर्भात बैठक झाली. त्यावेळी जगदीश मुळीक यांनी हा दावा केला.
विरोधकांनी टिळक कुटुंब नाराज असल्याच्या अफवा पसरवल्या आहेत. कसबा पोटनिवडणूक नियोजनाची बैठकीत कुणाल आणि शैलेश टिळक यांनी सहभाग घेऊन पक्षाला पाठिंबा दिला आहे. हेमंत रासने यांचा उमेदवारी भरताना शैलेश टिळक वैयक्तिक कारणामुळे आले नव्हते. भारतीय जनता पक्षाला पराभवाची भीती नाही. एक वर्षासाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन करण्यात आले होते.
मात्र विरोधकांनी पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्यात आला. मात्र महाविकास आघाडीच्या हातात काही नाही, याची जाणीव महाविकास आघाडीतील नगरसेवकांना आहे. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच गरज लागत आहे. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करण्यास ते इच्छुक आहेत, असे मुळीक यांनी सांगितले.