२०५- चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम सुरू असून २६ फेब्रुवारी रोजी मतदार होणार आहे. या अनुषंगाने मतदान केंद्राच्या १०० मीटर परिघात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी निर्बंध लागू केले आहेत.
चिंचवड मतदार संघातील पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील चिंचवड, सांगवी, वाकड, हिंजवडी, देहूरोड, रावेत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ८७ इमारतीतील ५१० मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदान सुरळीत व शांततेत पार पडावे, सार्वजनिक शांततेला व मालमत्तेला धोका पोहोचू नये आदींसाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
मतदान केंद्राच्या परिघात प्रतिबंधात्मक आदेश….
मतदानाचा दिवस २६ फेब्रुवारी रोजी ००.०१ वा. ते मतदान प्रक्रिया संपेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार या कालावधीत मतदान केंद्राच्या परिघापासून १०० मीटर सभोवतालच्या परिसरातील टपऱ्या, स्टॉल, दुकाने, वाणिज्यिक आस्थापना आदी तत्सम बाबी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच या कालावधीत मतदान केंद्र परिसर आणि मतदान केंद्राच्या आतील भागात कोणत्याही प्रकारची अग्नीशस्त्रे, हत्यारे बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशातून पोलीस दल, संरक्षण दल, तुरुंग विभाग, बँक सुरक्षा विभाग व कायदेशीर कर्तव्य बजावत असलेल्या इतर केंद्रीय तसेच राज्य शासनाचे अधिकारी व कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान कायदा कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र राहील, असेही पोलीस आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.