पुण्यात गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात कधी कोण काय करेल आणि कधी कोणत्या गोष्टीवरून राग येईल याचा कोणाला नेम नाही. पुण्यातला महर्षीनगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका इसमाने तरुणाला कुठे चालला आहेस इतक्या रात्री? असे विचारले म्हणून तरुणाने रागात १३ हून अधिक वाहनांची तोडफोड केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तोडफोड करणार्या तरूणाला स्वारगेट पोलिसांनी ताब्यात घेतले. ईश्वर सावणे (२०, इंदिरानगर कट्टा, इंदिरानगर कट्टा) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेला ईश्वर हा मार्केटयार्ड परिसरात कामास आहे. तो सोमवारी पहाटे दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास तो महर्षीनगर येथून रस्त्याने चालला असताना त्याला महर्षीनगर परिसरात एका नागरिकांने संशयावरून हटकले. याचाच राग मनात धरून त्याने परिसरात पार्क केलेली १३ हून अधिक वाहनांची तोडफोड केली. तोडफोड करणार्या संशयीत आरोपी ईश्वला स्वारगेट पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.