Thursday, May 23, 2024
Homeउद्योगजगतचिंचवड स्टेशनजवळील आनंदनगरमध्ये 1400 घरगुती वीजचोरी उघड, महावितरणची धडक मोहीम

चिंचवड स्टेशनजवळील आनंदनगरमध्ये 1400 घरगुती वीजचोरी उघड, महावितरणची धडक मोहीम

चिंचवड स्टेशनजवळील आनंदनगरमध्ये महावितरणने 15 आणि 16 मार्चला धडक मोहीम राबवली. यावेळी 1400 घरगुती वीजचोऱ्या उघडकीस आणल्या आहेत. महावितरणच्या शाखा अभियंता कृतिका भोसले आणि 17 सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली. या मोहिमेत थेट तारांवर टाकलेले आकडेही जप्त करण्यात आले. यानंतर नवीन घरगुती वीजजोडणी घेण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांची रीघ लागली आहे. तसेच या परिसरात वीजचोऱ्या होणार नाही यासाठी येत्या 15 दिवसांमध्ये एरियल बंच केबल लावण्यात येणार आहे.

चिंचवड शाखेअंतर्गत आनंदनगर हा परिसर येतो. या ठिकाणी 315 केव्हीए क्षमतेचे रोहित्र नादुरुस्त झाले होते. त्याची पाहणी करताना आकडे टाकून वीजचोऱ्या होत असल्याने अतिभारित झालेले रोहित्र नादुरुस्त झाल्याचे आढळून आले होते. महावितरणकडून लगेचच कारवाई करत सर्व आकडे काढून टाकण्यात आले. त्यानंतर दहा दिवसांपूर्वी आनंदनगरमध्ये नवीन रोहित्र बसवण्यात आले ते दोन दिवसांनी पुन्हा नादुरुस्त झाले. यानंतर चिंचवड शाखेच्या सहाय्यक अभियंता कृतिका भोसले तसेच आकुर्डी उपविभाग कार्यालयाचे सहाय्यक अभियंता शितल किनकर आणि अमित पाटील यांच्यासह 15 जनमित्रांनी बुधवारी (15 मार्च) सकाळी 10 वाजता आनंदनगरमध्ये वीजचोरीविरोधी पुन्हा विशेष मोहीम सुरु केली.

1400 घरगुती वीजचोऱ्या उघड..
त्यास विरोध करणाऱ्या नागरिकांना वीजचोरीचे परिणाम समजून सांगण्यात आले आणि अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन करण्यात आले. गुरुवारी (16 मार्च) या मोहिमेला सकाळी 11 वाजताच्या सुमारास विरोध वाढल्यामुळे पोलिसांचे सहकार्य घेण्यात आले. या दोन दिवसीय कारवाईमध्ये थेट आकडे टाकून तसेच इतर मार्गाने सुरु असलेल्या सुमारे 1400 घरगुती वीजचोऱ्या उघड करण्यात आल्या आणि वीजचोरीसाठी वापरलेले सर्व साहित्य जप्त करण्यात आले.

महावितरणकडून आनंदनगर परिसरातील वीजचोरीविरोधी कामगिरीबाबत मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी सहाय्यक अभियंता कृतिका भोसले यांच्याशी संवाद साधला आणि सर्व सहकाऱ्यांचं कौतुक केलं. या मोहिमेला भोसरीचे कार्यकारी अभियंता उदय भोसले, अतिरिक्त कार्यकारी अभियंता उमेश कवडे यांनीही सहकार्य केले.

मुख्य अभियंता पवार यांनी आनंदनगर परिसरात पुन्हा वीजचोऱ्या होऊ नयेत, यासाठी एरियल बंच केबलचा वापर करण्याची सूचना दिली व त्याचा आराखडा त्वरित तयार करण्याचे निर्देश दिले आहे. येत्या 15 दिवसांत एरियल बंच केबल लावण्यात येणार आहे. या मोहिमे दरम्यान महावितरणकडून वीजमीटर काढून कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही वीजचोरी होत असल्याचे दिसून आले. तसेच काहींनी थेट आकडे टाकून वीजचोरी केल्याचे आढळून आले. या सर्वांना अधिकृत नवीन घरगुती वीज जोडणी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नवीन वीज जोडणी घेण्यासाठी आतापर्यंत थकबाकीपोटी सुमारे 60 हजार रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. तसेच नवीन वीजजोडणीची मागणीही वाढली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments