गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेल्या कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुकीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या पोटनिवडणुकीसाठी २७ फेब्रुवारीला मतदान होणार होते. मात्र, या मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. बारावीची परीक्षा असल्यामुळे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. बारावी आणि इतर परीक्षा असल्यामुळे मतदानासाठी केंद्र उपलब्ध होणे अवघड आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी एक दिवस आधीच मतदान घेण्याचे ठरले आहे. त्यामुळे आता कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारीला मतदान होईल.या पोटनिवडणुकीचा निकाल ठरल्याप्रमाणे २ मार्च रोजीच जाहीर होणार आहे.
कसबा पेठ मतदारसंघातील भाजप नेत्या मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे अलीकडेच निधन झाले होते. त्यामुळे या दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या. परिणामी या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक होत आहे. या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. परंतु, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष पोटनिवडणूक लढण्यासाठी उत्सुक आहेत.