Wednesday, June 18, 2025
Homeआरोग्यविषयकपाकिस्तानच्या वादळाचा महाराष्ट्रावर परिणाम मुंबई, पुणे, कोकणात धुळीचे साम्राज्य….

पाकिस्तानच्या वादळाचा महाराष्ट्रावर परिणाम मुंबई, पुणे, कोकणात धुळीचे साम्राज्य….

पाकिस्तानकडून आलेल्या धुळीच्या वादळामुळे मुंबई, पुण्यासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात रविवारी दिवसभर वातावरण धुलीमय झाल्याचा अनुभव आला. धुळीच्या प्रभावामुळे अनेक ठिकाणी दृष्यमानता एक किलोमीटरपेक्षा कमी झाल्याचे दृश्य होते; तर दिवसाच्या कमाल तापमानातही घट नोंदली गेली.

महाराष्ट्रासाठी धुळीचे वादळ नवे नसले तरी हवामानाची ही घटना दुर्मिळ मानली जाते. शनिवारी पाकिस्तानातील कराचीला धडकलेले धुळीचे वादळ रविवारी गुजरात आणि अरबी समुद्रमार्गे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंत पोहोचले. आखाती देशांकडूनही धुळीचे लोट भारताच्या पश्चिम किनारपट्टीकडे सरकत असल्याचे उपग्रहीय चित्रांत दिसले.

रविवारी सकाळपासूनच पुणे आणि मुंबईत धुरकट हवेसह सूर्यप्रकाश कमी असल्याचे दृश्य होते. सकाळपासून वाहणाऱ्या वाऱ्यांनी मुंबईतले रस्ते, वाहने, झाडे यांच्यावर मोठ्या प्रमाणात धूळ जमा झाली होती. या परिस्थितीमुळे मुंबईच्या प्रदूषणाचा निर्देशांक रविवारी वाढला. ही परिस्थिती संध्याकाळच्या सुमारास हळुहळू निवळली. आज, सोमवारी मुंबईत धुळीचा प्रभाव कमी होईल, अशी माहिती भारतीय हवामान विभागातर्फे देण्यात आली. गुजरातवर निर्माण झालेले धुळीचे वादळ आणि मुंबईमध्ये वाहणारे पश्चिमी वारे यांच्या संयुक्त प्रभावामुळे मुंबईमध्ये धुळीचे वारे वाहत असल्याची माहिती वरिष्ठ हवामान अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींनीही हजेरी लावली. हवेत धुळीचे प्रमाण जास्त असल्याने अर्धा ते एक किलोमीटरच्या पुढील दृश्य अस्पष्ट दिसत होते. याचा थेट परिणाम वाहतुकीच्या वेगावरही झाला. पालघर ते रत्नागिरी आणि नंदुरबार ते सातारा या भागांत धुळीच्या वादळाचा जास्त प्रभाव दिसून आला.

कमाल तापमानाचा पारा उतरला

मुंबईमध्ये कुलाबा येथे २४, तर सांताक्रूझ येथे २३.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाचा पारा होता. अवघ्या २४ तासांमध्ये कुलाबा येथे ६ अंशांनी तापमान उतरले, तर सांताक्रूझ येथेही सुमारे ६ अंशांनी कमाल तापमानाचा पारा उतरला होता. हे तापमान सरासरीपेक्षा कुलाबा येथे ५.८ अंशांनी आणि सांताक्रूझ येथे ६.९ अंशांनी कमी होते. सांताक्रूझ येथे जानेवारीतील सर्वांत कमी कमाल तापमानाचा रविवारी नवा विक्रम नोंदवला गेला. जानेवारीतील गेल्या १० वर्षांमधील हे सर्वांत कमी कमाल तापमान होते. गेल्या १० वर्षांमध्ये सन २०२०मध्ये २५.३ अंश सेल्सिअस हे सर्वांत कमी कमाल तापमान होते. त्यानंतर सन २०२२मध्ये नवा विक्रम नोंदवला गेला. मुंबईमध्ये दिवसभरात सूर्यदर्शनही न झाल्याने कमाल तापमानाचा पारा चढला नव्हता. सांताक्रूझ येथे किमान तापमान २१, तर कुलाबा येथे २१.६ अंश सेल्सिअस होते. ढगाळ वातावरणामुळे रविवारी किमान तापमानाचा पारा शनिवारच्या तुलनेत चढला. मात्र त्यानंतर दिवसभरात फारसा तापमान बदल झाला नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments