गेले दहा दिवस मोठ्या भक्तीभावाने बाप्पाची पूजा करणाऱ्या गणेश भक्तांनी जातानाही बाप्पाला मोठ्या धुमधडाक्यात निरोप दिला. यावर्षीही गणेश मंडळांनी जय्यत तयारी केली होती. गुलालाची उधळण न करता पर्यावरणपूरक तसेच भक्तीमय वातावरणात दहाव्या दिवशी पिंपरी चिंचवड शहरातील विसर्जन संपन्न झाले.
भोसरीतील गणेश मंडळ व गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी भोसरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महापालिकेच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. यावेळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे उप आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, श्रीनिवास दांगट, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, प्रशासन अधिकारी नाना मोरे, कार्यकारी अभियंता महेश काळे, शिवराज वाडकर, सहाय्यक आरोग्याधिकारी राजेश भाट, कार्यालयीन अधीक्षक ज्ञानेश्वर ढवळे आदी अधिकारी, कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधींनी गणेश मंडळांचे स्वागत केले. यामध्ये संत ज्ञानेश्वर भाजी मंडई, कानिफनाथ मित्र मंडळ, श्रीगणेश मित्र मंडळ, श्रीराम मित्र मंडळ, पठारे लांडगे तालीम, लांडगे लिंबाची तालीम, शिवशक्ती मित्र मंडळ, श्रीकृष्ण मित्र मंडळ, दामुशेठ गव्हाणे मित्र मंडळ, फुगे माने तालीम मंडळ, समस्त गव्हाणे तालीम मंडळ, छत्रपती शिवाजी तरूण मंडळ, नरवीर तानाजी तरूण मंडळ, लोंढे तालीम मित्र मंडळ, महाले फुगे तालीम मित्र मंडळ, नव महाराष्ट्र तरूण मंडळ, लांडगे ब्रदर्स ऍण्ड फ्रेंन्ड्स सर्कल, नाथसाहेब प्रतिष्ठाण, अष्टविनायक मित्र मंडळ, नवज्योत मित्र मंडळ, आदर्श मित्र मंडळ, शिवराजे मित्र मंडळ, शिवराजे मित्र मंडळ, धर्मवीर संभाजी मित्र मंडळ, निसर्ग मित्र मंडळ, गणेश तरूण मंडळ, छत्रपती शिवाजी मित्र मंडळ, महात्मा फुले मित्र मंडळ, युवा शक्ती मित्र मंडळ आदी गणेश मंडळांचा समावेश होता.
महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या या स्वागत कक्षाच्या ठिकाणी रुग्णवाहिका, अग्निशामक वाहन, आपत्ती व्यवस्थापन पथक, महापालिकेचे सुरक्षा रक्षक, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान तैनात ठेवण्यात आले होते. तसेच गणपती विसर्जनाच्या दिवशी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या महापालिकेच्या आवाहनाला नागरिकांनी तसेच गणेश मंडळांनी उस्फुर्त प्रतिसाद दर्शविला. महापालिकेच्या वतीने निर्माल्य संकलनासाठी निर्माल्य कुंडांचीही व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी गणेश विसर्जन करण्यासाठी येणारे नागरिक सर्व निर्माल्य निर्माल्य कुंडातच टाकत होते. तसेच या विसर्जन घाटांवर ‘गणेश विसर्जन फिरती पथक’ वाहन मूर्ती संकलित करण्यासाठी तैनात करण्यात आले होते. या ठिकाणी गणेश विसर्जनासाठी येणारे नागरिक उस्फुर्तपणे मूर्तीदान करताना दिसत होते. तसेच विसर्जनाच्या ठिकाणी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबतचे सूचना फलक महापालिकेच्या वतीने लावण्यात आले होते.