देशातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच इंडियन मेडिकल असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदींना यासंदर्भात पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरातील १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्याची तातडीने परवानगी देण्यात यावी अशी मागणीही केली आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रामध्ये तुमच्या नेतृत्वाखाली कोरोनाविरुद्धचा लढा सुरु असतानाच देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असल्याचं सांगताना खेद होत आहे, असं म्हटलं आहे. तसेच पुढे देशामध्ये सध्या सात लाख ४० हजार अॅक्टीव्ह कोरोना रुग्ण असल्याचंही इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर चार एप्रिल २०२१ रोजी पहिल्यांदाच एका दिवसात एक लाखांहून अधिक करोना रुग्ण २४ तासांमध्ये आढळून आले. ही कोरोनाची साथ सुरु झाल्यानंतरची सर्वात मोठी वाढ आहे, अशी चिंता या संस्थेने व्यक्त केली आहे.
आतापर्यंत देशामध्ये ७ कोटी ९१ लाख व्यक्तींना कोरोनाची लस देण्यात आली असून त्यापैकी ६ कोटी ८६ लाख व्यक्तींना पहिला डोस तर एक कोटी पाच लाख व्यक्तींना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. सध्या ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना कोरोनाची लस दिली जात आहे. मात्र ज्या वेगाने संसर्ग होत आहे ते पाहता आम्ही तुम्हाला विनंती करतो की लसीकरणाची गती वाढवली पाहिजे आणि १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्याची परवानगी देण्यात आली पाहिजे.
सर्व नागरिकांना घरापासूनच चालत जाता येईल अशा अंतरावर कोरोना लसीकरण केंद्र उफलब्ध करुन दिलं पाहिजे. तसेच लसीकरणासाठी खासगी क्लिनिक आणि रुग्णालयांचीही मदत घेतली पाहिजे. प्रत्येक डॉक्टरकडे लसीकरणाची सोय असेल तर त्याचा सकारात्मक परिणाम लसीकरणावर दिसून येईळ असा विश्वास असोसिएशनने व्यक्त केलाय. जिल्हा स्तरावर कोरोना लसीकरण टास्क फोर्स टीम तयार करुन त्यामध्ये सरकारी तसेच खासगी व्यक्तींची मदत घेऊन तळागाळातील व्यक्तींपर्यत लसीकरण पोहचवण्याची व्यवस्था उभारली पाहिजे. यासाठी असोसिएशन आणि त्यामधील सभासद काम करण्यासाठी तयार आहेत, असं असोसिएशनने पंतप्रधानांना या पत्रातून कळवलं आहे.