पिंपरी-चिंचवडने दिलेले प्रेम आणि आपुलकी मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. माझ्या मेडलचा प्रस्ताव मुंबईत असताना दोन वेळा गेला होता. पण पिंपरी-चिंचवड शहरात आल्यानंतर त्याबाबतचे पदक जाहीर झाले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर माझ्यासाठी लकी आहे, असे मत पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना वैशिष्ट्यपूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले. त्याबद्दल पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयुक्त चौबे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार उमा खापरे यांनीही आयुक्तांचा सत्कार केला.
कार्यक्रमासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, आमदार आण्णा बनसोडे, आमदार उमा खापरे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, विवेक खरवडकर, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुकृत मोकाशी आदी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले, “या सत्काराबद्दल पुणे श्रमिक पत्रकार संघाचे मनापासून आभार. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मला राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले.
त्यांनतर सर्व स्तरातून मला आपुलकीने सर्वांनी शुभेच्छा दिल्या. पिंपरी-चिंचवडने दिलेले प्रेम आणि आपुलकी मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. माझ्या मेडलचा प्रस्ताव मुंबईत असताना दोन वेळा गेला होता. पण पिंपरी-चिंचवड शहरात आल्यानंतर त्याबाबतचे पदक जाहीर झाले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर माझ्यासाठी लकी आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय लोकाभिमुख करण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. पिंपरी-चिंचवड शहरात असणाऱ्या अडचणी पहिल्या पोलीस आयुक्तांपासून माझ्यापर्यंत सर्वांनी सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस आणि जनता वेगळे नाही. नागरिकांनी आमचे डोळे आणि कान बनावे. नागरिक दोन पावले पुढे आले तर आम्ही चार पावले पुढे येऊन शहरातील गुन्हेगारी नेस्तनाबूत करून टाकू.
सूत्रसंचालन अनिल कातळे यांनी केले. प्रास्ताविक रोहित आठवले यांनी केले. आभार अमोल येलमार यांनी मानले.