अलीकडे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनाही करोनाची लागण झाली आहे. या यादीत आता दिग्गज गायिका लता मंगेशकर यांच्याही नावाचा समावेश झाला आहे. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याला करोनाची सौम्य लक्षणं आहेत.
त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅंडी इस्पितळात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, लता मंगेशकर यांना वयोमानानुसार समस्या आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची भाची रचना यांनी कुटुंबाला प्रायव्हसी देण्यास सांगितले तसेच लता दीदींसाठी देवाकडे प्रार्थना करण्याचीही विनंती त्यांनी केली.
करोना व्हायरसने देशात पुन्हा आपलं रौद्र रुप दाखवायला सुरुवात केली आहे. अनेक सेलिब्रिटी सध्या करोना पॉझिटिव्ह असून त्यांना घरात क्वारन्टीन करण्यात आले आहे. यात हृतिक रोशनची पूर्वाश्रमिची पत्नी सुजान खान, जॉन अब्राहम, प्रेम चोप्रा, नोरा फतेही, एकता कपूर, दृष्टी धामी यांच्यासह अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींचा समावेश आहे.
लता मंगेशकर यांनी गेल्या वर्षी २०२१ सप्टेंबरमध्ये त्यांचा ९२ वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव केला गेला. लता दीदी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्या अनेकदा चाहत्यांसाठी जुने फोटो आणि मनोरंजक किस्से शेअर करताना दिसतात. लता मंगेशकर यांना पद्मभूषण, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि अनेक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.