Wednesday, February 11, 2026
Homeगुन्हेगारी“माझा फोन टॅप केला आणि नाव ठेवलं अमजद खान”, नाना पटोलेंचा सभागृहात...

“माझा फोन टॅप केला आणि नाव ठेवलं अमजद खान”, नाना पटोलेंचा सभागृहात गंभीर आरोप..

६ जुलै २०२१,
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी यावेळी बोलताना फोन टॅपिंगसंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. “२०१६-१७मध्ये माझा फोन टॅप करण्यात आला. मी खासदार होतो, त्यामुळे माझ्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचं काही कारण नव्हतं. पण माझा फोन टॅप केला आणि माझं नाव ठेवलं गेलं अमजद खान”, असं नाना पटोले यावेळी सभागृहात म्हणाले. तसेच, आपल्यासोबतच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पीए, तसेच खासदार संजय काकडे यांचा देखील फोन टॅप करण्यात आला असा आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला.

“मी खासदार होतो. माझ्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचं कारण काही नव्हतं. पण मला मिळालेल्या माहितीनुसार माझं नाव ठेवण्यात आलं होतं अमजद खान. केंद्रातले सध्याचे मंत्री दानवे यांच्या पीएचा नंबर देखील टॅप केला गेला. खासदार संजय काकडेंचा नंबर टॅप केला गेला. अशी खूप नावं आहेत. त्यांच्याच लोकांचे देखील फोन टॅप केले गेले. कुणाचीही गोपनीयता भंग करण्याचा अधिकार कुणालाही नाही. धर्मातही हेच म्हटलं आहे की कुणाच्या गोष्टी आपण ऐकल्या तर ते पाप असतं. आता सुसंस्कृत लोकं असं राजकारण करत असतील तर माहिती नाही”, असं नाना पटोले यावेळी म्हणाले.

दरम्यान, यावेळी नाना पटोले यांनी आपल्याला मुसलमानांचंच नाव (अमजद खान) का टाकलं? यावर आक्षेप घेतला. “मुसलमानांचीच नावं का टाकली? सरळ माझंच नाव टाकायला हवं होतं. या पद्धतीने हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करून धर्माच्या नावाने राजकारण करून राज्य पेटवायचं हा उद्देश होता का?” असा सवाल त्यांनी केला.

“हे फोन टॅपिंग करण्याची गरज काय? याच्यामागे कोण आहे? २०१७-१८ च्या काळात पुणे पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून हे फोन टॅप केले गेले. कुणाच्या आदेशाने हे झाले? साखर कारखान्यांबद्दल तक्रारींची मोहीम सुरू आहे. गडकरी साहेबांची देखील तक्रार केली आहे. त्यांचेच लोक आता पत्र देत आहेत. या सगळ्या गोष्टींची माहिती गृहमंत्र्यांनी आम्हाला द्यावी. आमच्यावर आरोप लावले की ही व्यक्ती कोणतंही काम, व्यवसाय करत नाही. अंमली पदार्थांची तस्करी करत आहे. हे माझ्यावरच नाही, तर जितक्या लोकांचे फोन टॅप झाले, त्यांच्यावर हा आरोप करण्यात आला. किती लोकांचे, कुणाचे फोन टॅप केले गेले याची माहिती हवी. याचे सूत्रधार कोण आहेत? याला शासनाची मान्यता घ्यावी लागते”, अशी मागणी नाना पटोले यांनी यावेळी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments