Monday, July 14, 2025
Homeताजी बातमीमी सर्वप्रथम भारतीय ही भावना ठेवा - संजय भाटे

मी सर्वप्रथम भारतीय ही भावना ठेवा – संजय भाटे

गांधी पेठ तालीम मित्र मंडळाच्या जिजाऊ व्याख्यानमालेचा समारोप

सर्व भारतीय नागरिकांच्या प्रतिष्ठेची हमी देणारे ‘बंधुत्व’ हा शब्द संविधानाच्या प्रास्ताविकेत आहे. मी सर्वप्रथम भारतीय आहे, ही भावना सर्वांनी ठेवली तरच बंधुत्व जोपासले जाईल आणि ‘माझे संविधान, माझा अभिमान’ असे प्रत्येकाला गौरवाने म्हणता येईल असे प्रतिपादन निवृत्त न्यायाधीश संजय भाटे यांनी केले.

चिंचवड गावातील गांधी पेठ तालीम मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या जिजाऊ व्याख्यानमालेत समारोप प्रसंगी ‘माझे संविधान, माझा अभिमान’ या विषयावर ॲड. भाटे बोलत होते. जिजाऊ व्याख्यानमालेचे हे ३४ वे वर्ष होते. यावेळी चिखली येथील संत पिठाचे मानद संचालक अभय टिळक यांना ‘चिंतामणी पुरस्कार’, पंढरपूर येथे पालवी या संस्थेच्या माध्यमातून एचआयव्ही व एड्सग्रस्त मुलांचे, महिलांचे संगोपन करणाऱ्या मंगलाताई शहा यांना ‘जिजाऊ पुरस्कार’ आणि खडकवासला धरणात बुडणाऱ्या सात तरुणींना स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवणारे संजय माताळे यांना ‘क्रांतिवीर चापेकर पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष किसन महाराज चौधरी, संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, व्याख्यानमालेचे समन्वयक सुहास पोफळे, गणेशोत्सव समिती अध्यक्ष विपुल नेवाळे, सदस्य महेश गावडे, धीरज गुत्ते, जगदीश घुले, प्रवीण भोकरे, संदीप जंगम, अतुल आचार्य, विजय भिसे, विश्वनाथ अवघडे, हेमा सायकर, राजेंद्र घावटे आदी उपस्थित होते.

भाटे यांनी सांगितले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानात नागरिकांना मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. नव्या युगाला, आधुनिक काळाला सुसंगत या संविधानात आतापर्यंत १०६ वेळा सुधारणा करण्यात आल्या आहेत. १९७६ मध्ये ४२ व्या दुरुस्तीत ‘निधर्मवाद’ या शब्दाचा समावेश करण्यात आला. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेची सुरुवात ‘वुई द पीपल ऑफ इंडिया’ या पाच शब्दांनी केली आहे. यातून संधी आणि उत्पन्नाची विषमता दूर करणे अभिप्रेत आहे. देशाचा कारभार चालवण्यासाठी विविध घटनात्मक संस्थांची गरज असते त्यांची निर्मिती संविधानानुसार होते. स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये महसुली उत्पन्नाचे वाटप कायद्यानुसार केले जावे याचे मार्गदर्शन संविधान करते. यात वादविवाद, भेदभाव निर्माण झाल्यास न्यायालयात दाद मागता येते. त्यानुसार कर्नाटक सरकारने जीएसटीचा हिस्सा मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता कर्नाटक सरकारला जीएसटीचा हिस्सा मिळणार आहे हे ताजे उदाहरण आहे असेही भाटे यांनी यावेळी नमूद केले.

स्वागत, प्रास्ताविक करताना राजाभाऊ गोलांडे यांनी सांगितले की, जिजाऊ व्याख्यानमाला आता ३५ व्या वर्षात पदार्पण करीत असून यामध्ये संस्थापक भाऊसाहेब भोईर, विजय कांबळे, बाळू कुंभार, स्वर्गीय गजानन चिंचवडे आदींसह अनेकांचे महत्वपूर्ण योगदान आहे. सूत्र संचालन स्वाती देशपांडे आणि आभार सुहास पोफळे यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments