Monday, April 22, 2024
Homeताजी बातमीअसा राज्यपाल पाहिला नाही, त्यांना कंगनाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांना भेटायला नाही...

असा राज्यपाल पाहिला नाही, त्यांना कंगनाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांना भेटायला नाही – शरद पवार

२५ जानेवारी २०२१,
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत आयोजित संयुक्त शेतकरी कामगार मोर्चात केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. तसेच पवारांनी शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत आला असताना गोव्याला निघून जाणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचेही कान उपटले आहेत. “महाराष्ट्राच्या इतिहासात असा राज्यपाल आम्ही पाहिला नाही. त्यांना अभिनेत्री कंगना रनौतला भेटायला वेळ आहे, पण माझ्या कष्टकरी अन्नदाता शेतकऱ्याला भेटायला वेळ नाही,” असं म्हणत टीका केली.

शरद पवार म्हणाले, “शेतकरी कामगार मोर्चाच्या आयोजकांनी मला सांगितलं की सभेनंतर शेतकऱ्यांच्यावतीने राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एक निवेदन देण्यात येणार आहे. पण महाराष्ट्राच्या इतिहासात आम्हाला असे राज्यपाल भेटले नाही. मुंबईत लाखोंच्या संख्येने येणार आहेत, राज्यपालांना भेटून फक्त निवेदन देणार आहेत. असं असताना राज्यपाल गोव्याला गेले. त्यांना कंगनाला भेटायला वेळ आहे, पण माझ्या शेतकऱ्याला भेटायला वेळ नाही. त्यामुळे आता हे निवेदन कुठं द्यायचं काय करायचं याचा विचार करावा लागेल.”

देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात आक्रमकपणाची भूमिका मुंबईने घेतली, संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी मुंबईतील कष्टकरीवर्ग रस्त्यावर उतरला, यावेळेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लोक मुंबईला आले आहेत, “राज्याच्या राज्यपालाची ही नैतिक जबाबदारी होती की त्या राज्यातील कष्टकरी अन्नदाता या ठिकाणी फक्त निवेदन देण्यासाठी तुमच्याकडे येतोय. खरं म्हणजे त्यांनी याला सामोरं जायला हवं होतं. पण त्यांच्यात तेवढी सभ्यता नाही. त्यांनी कमीत कमी राजभवनात तरी बसायला हवं होतं. पण तेही धैर्य त्यांनी दाखवलं नाही. मी त्यावर अधिक बोलू इच्छित नाही,” असंही शरद पवार यांनी राज्यपालांना खडसावलं.

विशेष म्हणजे याधी देखील शरद पवार यांनी राज्यपालांच्या वर्तनावर निशाणा साधला होता. राज्यपालांनी त्यांचं कॉफी टेबल बुक प्रकाशित केलं होतं. त्यावरुन पवारांनी राज्यपालांचे वाईटरीत्या कान टोचले होते. दरम्यान, याआधी शरद पवार यांनी राज्यपालांच्या पुस्तकाच्या शिर्षकावरुनच त्यांना फटकारलं होतं. “वास्तविक भारतीय संविधानात ‘जनराज्यपाल’ असा उल्लेख आढळत नाही, तरीही राज्य शासनाच्यावतीने सुबक छपाई असलेले आपल्या एक वर्षाच्या मर्यादित कालावधीवर प्रकाश टाकणारे स्व प्रसिद्ध कॉफी टेबल बुक पाठवण्यात आले याबद्दल धन्यवाद”, अशा शब्दात पवार यांनी राज्यपालांच्या पत्राला खोचक उत्तर दिलं होतं.

“आपल्या मर्यादित कालावधीतील एखाद-दुसरा प्रसंग वगळता शपथविधी, स्वागत समारंभ, दीक्षांत समारंभ यांसारखे सोहळे, उच्चपदस्थ अभ्यागतांच्या – मान्यवरांच्या भेटीगाठी, इतर सामाजिक – सांस्कृतिक कार्यक्रम वर त्यातील आपल्या सहभागाची छायाचित्रे पाहण्यात आली. तसेच निधर्मवादा संदर्भात राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची आणि त्या उपरांत केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद या पुस्तकात दिसून आली नाही”, असा टोलाही शरद पवार यांनी पत्राच्या माधम्यातून लगावला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments