Friday, September 20, 2024
Homeराजकारण“मला त्या पापात वाटेकरी व्हायचं नाही”, ठाकरे गटात प्रवेश करताच खासदार उन्मेश...

“मला त्या पापात वाटेकरी व्हायचं नाही”, ठाकरे गटात प्रवेश करताच खासदार उन्मेश पाटलांचा भाजपावर गंभीर आरोप

जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी आज (३ एप्रिल) अधिकृतपणे शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. पाटील यांनी शिवसेना (उबाठा गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाची मशाल हाती घेतली. उन्मेश पाटलांचं ठाकरे गटात स्वागत करताना राज्यसभेचे खासदार संजय राऊत म्हणाले, जळगावासह उत्तर महाराष्ट्रातलं एक नेतृत्व आज आपल्या शिवसेनेत सहभागी होत आहे. त्यांच्याबरोबर पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार आणि असंख्य पदाधिकारी-कार्यकर्तेदेखील आज शिवसेनेत दाखल झाले आहेत. अनेक संघटनांचे पदाधिकारी त्यांच्याबरोबर शिवसेनेत प्रवेश करत आहेत. उन्मेश पाटील हे निष्ठावंत भाजपा कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. परंतु, निष्ठावंतांच्या नशिबी नेहमीच संघर्ष असतो. म्हणूनच ते निष्ठावंतांची कदर करणाऱ्या शिवसेनेत आले आहेत. पाटील यांच्या शिवसेनेत येण्याने शिवसेनेला उत्तर महाराष्ट्रात ताकद मिळेल.

पक्षप्रवेशावेळी खासदार उन्मेश पाटील म्हणाले, महाराष्ट्राचा स्वाभिमान जागृत ठेवत, भारताला मराठी बाणा दाखवणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आज मी प्रवेश करत आहे. मी भाजपा सोडून ठाकरे गटात प्रवेश करत असल्याने मला अनेकजण विचारत आहेत की, उमेदवारी मिळाली नाही म्हणून तुम्ही नाराज आहात का? मी या सर्वांना स्पष्टपणे सांगू इच्छितो की, राजकारण करताना आमदार, खासदार होणं हे एवढंच माझं ध्येय नव्हतं. मी खूप चांगल्या हेतूने काम करत होतो. परंतु, राजकारणात काम करताना, आमदार असताना आज आपण जी शासकीय योजनांची जत्रा पाहतोय, त्याचा पॅटर्न आम्ही चाळीसगावात राबवला होता. दुर्दैवाने त्याला किंमत मिळाली नाही. मी मागणी न करता मला मागील वेळेस लोकसभा उमेदवारी मिळाली. परंतु, यावेळी मला एका भावाने दगा दिला तरी दुसरा भाऊ म्हणजे शिवसेना माझ्याबरोबर आहे आणि याचा मला आनंद आहे.

खासदार पाटील म्हणाले, आम्हाला बदल्याचं नव्हे तर बदलाचं राजकारण हवं आहे. पद महत्वाचं नाही. परंतु, आमची अवहेलना करण्यात आली, मला मानसन्मान नको, कार्यकर्त्याची अवहेलना होते तेव्हा तो घुसमटतो. राज्यात विकासाऐवजी विनाशाची, बदलाऐवजी बदल्याची भावना रुजवली जात आहे. परंतु, मला त्या पापातला वाटेकरी व्हायचं नाही. आमचा स्वाभिमान जपला जात नसेल, बैठकीला बोलावलं जात नसेल, तर स्वाभिमान गहाण ठेवण्याऐवजी मी या लढाईत सहभागी व्हायचं ठरवलं आहे. क्रांतीची मशाल पेटवायचं ठरवलं आहे. मी शब्द देतो की, मी पदासाठी किंवा खासदार होण्यासाठी इथे (ठाकरे गट) आलो नाही. उद्धव ठाकरे यांनी मला सांगितलं आहे की, जळगावात शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे. माझ्यासह सर्व सहकारी जळगावात मशाल पेटवू. मला आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना शिवसेनेनं सामावून घेतलं आहे. त्याबद्दल मी उद्धव ठाकरेंचे आभार मानतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments