२ ऑक्टोबर रोजी ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला. तेव्हापासून तो पोलिसांच्या रडारवर होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांचं गुन्हे शाखा पथक त्याच्या मागावर होते. ललित पाटील चेन्नईत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी चेन्नईतून ललितला अटक केली आहे. दरम्यान, त्याच्या आईवडिलांनी ललितचं एन्काऊंटर होणार असल्याची भीती व्यक्त केली आहे. तसंच, ललितला आज अंधेरी कोर्टातही हजर केले जाण्याची शक्यता आहे. यावेळी त्याच्याकडून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर त्याने मोठा खुलासा केला आहे.
ललित पाटील पोलिसांच्या गाडीत बसण्याआधी तो म्हणाला की, “मी लवकरच पत्रकारांशी बोलणार आहे.” त्यानंतर, त्याला रुग्णालयात नेले जात असताना, “मी ससूनमधून पळून गेलो नाही. मला पळवलं गेलंय. मला पळवण्यामागे कोणा-कोणाचा हात आहे हे लवकरच सांगणार आहे”, असंही ललित पाटील म्हणाला. त्याच्या या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा संशय निर्माण झाला आहे. या प्ररकणाला राजकीय वळण लागल्याने ललित पाटील कोणाची नावं घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, ललित पाटील नऊ महिन्यांपासून पुण्यातील ससून रुग्णालयात होता. तो इतके रुग्णालयात का दाखल होता? रुग्णालयातून तो कसा पळाला? ससूनमधून पळाल्यानतंर तो कुठे लपून बसला होता? चेन्नईत तो कसा पळाला? चेन्नईतून तो कुठे जाणार होता? तसंच, पलायन करण्याकरता त्याला कोणी कोणी मदत केली हे सर्व प्रश्न अनुत्तरीत आहे. ललितची चौकशी केल्यानंतरच ही माहिती बाहेर येईल.