२५ ऑगस्ट २०२१,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर रात्री उशिरा त्यांना महाडमध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीन दिला. त्यानंतर आता नारायण राणे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवलाय. राणे पहाटेच्या सुमारास मुंबई पोहोचले. त्यानंतर दुपारी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी दिशा सालियान प्रकरणात नाव आलेल्या त्या मंत्र्याला आणि अनिल परब यांना नारायण राणे यांनी थेट इशारा दिलाय. आता त्या मंत्र्याला अटक होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असं सूचक वक्तव्य राणेंनी केलंय.
अनिल परब अधिकाऱ्यांना आदेश देतो की पकडा त्याला. अरे काय सुरु आहे. दिशा सालियान प्रकरणात कोण मंत्री उपस्थित होता? त्याचा छडा का लागत नाही. पूजा चव्हाण प्रकरणातही तेच झालं. आता त्या मंत्र्याला अटक होईपर्यंत मागे हटणार नाही. त्या मंत्र्याविरोधात कोर्टात जाणार. लोकशाही मार्गानं लढा देणार. ज्यांनी दिशा सालियानची हत्या केली, ते आत जाईपर्यंत आता स्वस्थ बसणार नाही, अशा सूचक इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. अनिल परब यांच्या प्रकरणातही चौकशी सुरु आहे, त्याचाही आता पाठपुरावा सुरु राहील, असंही राणेंनी म्हटलंय. काही गोष्टी करायला हे प्रवृत्त करत आहेत. फार सभ्य आहेत ना, काहीच करत नाहीत ना, आता जनतेला त्यांची करामत कळू द्या, अशा कडक शब्दात राणेंनी शिवसेनेवर हल्ला चढवलाय.
राणे यांनी यावेळी मला अटक झाली नाही, असा दावा केला. ‘माझ्याविरुद्ध आलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. जी कलमं लावली होती त्यानुसार मला कोर्टात हजर करावं लागेल, असे पोलिसांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी विनंती केली. त्यावर मी सहकार्य केले. अॅरेस्ट बिरेस्ट काही नाही. संगमेश्वरहून महाडपर्यंत मी माझ्या गाडीनेच प्रवास केला. हवं तर तुम्ही ते तपासू शकता. मी तुम्हाला माझ्या गाडीचा नंबर देतो. कोर्टात जाईपर्यंत मला कोणी अटक केली नाही’, असा दावा राणे यांनी केला. महाड आणि आणि आता मुंबई हायकोर्ट अशा दोन्ही ठिकाणी निकाल माझ्या बाजूने लागले आहेत. मी असं काय बोललो होतो की ज्याचा तुम्हाला राग आला. ते वाक्य मी परत बोलणार नाही. पण मी, माझी मुलं कुणीच घरी नसताना माझ्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. तुम्हालाही घर आणि मुलंबाळं आहेत, इतकं लक्षात ठेवा, असे नमूद करत मुख्यमंत्री ठाकरे यांचे नाव न घेता राणे यांनी इशारा दिला.


