Wednesday, November 11, 2026
Homeअर्थविश्वपुण्यातील तळेगाव येथे ह्युंदाईच्या अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते...

पुण्यातील तळेगाव येथे ह्युंदाईच्या अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; ११ हजार कोटींची गुंतवणूक 

२०३० पर्यंत वार्षिक उत्पादन क्षमता ३.२ लाख वाहनांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट

पुणे, दि. १४ ऑक्टोबर २०२६ : ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेडने (एचएमआयएल) महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे उभारलेल्या अत्याधुनिक वाहन उत्पादन प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. ह्युंडाईच्या भारतातील विस्ताराच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. या प्रकल्पात टप्प्याटप्प्याने ११ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून, औद्योगिक विकास, रोजगारनिर्मिती आणि वाहन उत्पादन क्षेत्राला यामुळे चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

या उद्घाटनप्रसंगी कोरिया प्रजासत्ताकाचे भारतातील राजदूत ली सेओंग-हो, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, ह्युंडाई मोटर ग्रुपचे कार्यकारी अध्यक्ष युसन चंग, उपाध्यक्ष जेहून चांग, ह्युंडाई मोटर कंपनीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी होजे मुनोज आणि ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण गर्ग उपस्थित होते.

२०३० पर्यंत उत्पादन क्षमता ३.२ लाख वाहनांपर्यंत

तळेगाव येथील या प्रकल्पाची सध्याची वार्षिक स्थापित उत्पादन क्षमता १ लाख ७० हजार वाहनांची आहे. टप्प्याटप्प्याने विस्तार करून २०३० पर्यंत ही क्षमता वार्षिक ३ लाख २० हजार वाहनांपर्यंत नेण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. चेन्नई येथील उत्पादन प्रकल्पासह ह्युंडाईची भारतातील एकूण उत्पादन क्षमता २०३० पर्यंत वार्षिक सुमारे ११ लाख ४० हजार वाहनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

या प्रकल्पात अंतर्गत ज्वलन इंजिन (आयसीई) आणि हायब्रिड वाहनांच्या उत्पादनासाठी अनुकूल अशी लवचिक उत्पादन यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. तसेच, वाहन उत्पादनाला पूरक ठरणाऱ्या अत्याधुनिक इंजिन विभागात वार्षिक १ लाख ५० हजार इंजिन तयार करण्याची क्षमता आहे.

४० लाख वाहनांच्या निर्यातीचा टप्पा

या विशेष प्रसंगी ह्युंडाईने १९९९ पासून भारतातून ४० लाख प्रवासी वाहनांच्या एकत्रित निर्यातीचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याची घोषणा केली. कंपनीच्या माहितीनुसार, भारतातून ४० लाख वाहनांची निर्यात करणारी ह्युंडाई ही पहिली वाहन उत्पादक कंपनी ठरली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कंपनीने आतापर्यंत जवळपास एक कोटी प्रवासी वाहनांची विक्री केली आहे. या कामगिरीमुळे जागतिक वाहन उत्पादन आणि निर्यात क्षेत्रातील भारताचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला चालना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ह्युंडाई मोटर इंडियाच्या पुणे प्रकल्पाचे उद्घाटन आणि कंपनीने साध्य केलेला ४० लाख वाहनांच्या निर्यातीचा टप्पा जागतिक वाहन उत्पादन केंद्र म्हणून भारताची वाढती ताकद दर्शवतो. प्रगत उत्पादन तंत्रज्ञान, नावीन्य, स्थानिकीकरण आणि कौशल्य विकासातील ह्युंडाईची गुंतवणूक महाराष्ट्राच्या आर्थिक वाढीसह रोजगारनिर्मिती आणि मजबूत वाहन उद्योग परिसंस्थेच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देईल. महाराष्ट्र सरकार ह्युंडाईच्या भविष्यातील विकास प्रवासाला पूर्ण पाठबळ देईल.”

५५ पुरवठादारांची ४,६०० कोटींची गुंतवणूक

या प्रकल्पाला पूरक असलेल्या पुरवठादार परिसंस्थेने महाराष्ट्रात आतापर्यंत जवळपास ४ हजार ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. पुणे परिसरात कार्यरत असलेल्या ५५ पुरवठादार भागीदारांचे या परिसंस्थेला पाठबळ आहे. यातील जवळपास निम्मे पुरवठादार जाळे प्रकल्पाच्या ५० किलोमीटरच्या परिघात आहे. प्रथम आणि द्वितीय श्रेणीतील पुरवठादारांच्या माध्यमातून राज्यात १८ हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण झाल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यामुळे स्थानिक उद्योग, पूरक व्यवसाय आणि वाहन उद्योगाच्या पुरवठा साखळीला बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे.

एआय आणि इंडस्ट्री ४.० तंत्रज्ञानाचा वापर

तळेगाव येथील प्रकल्पात इंडस्ट्री ४.० तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डिजिटल सिम्युलेशन आणि प्रगत गुणवत्ता तपासणी प्रणालींचा वापर करण्यात येणार आहे. ई-फॉरेस्ट डिजिटल प्लॅटफॉर्मच्या आधारे उभारलेल्या या उत्पादन परिसंस्थेत प्रतिबंधात्मक देखभाल, दोष शोध प्रणाली आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी एआय-आधारित उपाययोजनांचा समावेश आहे.

कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक प्रशिक्षण केंद्रे, ऑगमेंटेड रिअॅलिटीवर आधारित प्रशिक्षण सुविधा, वैद्यकीय केंद्र आणि कल्याणकारी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांसाठी केलेल्या कार्यस्थळाच्या रचनेला २०२६ चा रेड डॉट पुरस्कार मिळाल्याचे कंपनीने सांगितले.

संशोधन, विद्युतीकरण आणि भविष्यातील मोबिलिटीवर भर

उत्पादनासोबतच संशोधन, नावीन्य आणि विद्युतीकरण क्षेत्रातही ह्युंडाई भारतात गुंतवणूक करत आहे. देशातील सात प्रमुख शैक्षणिक संस्थांशी कंपनीचे सहकार्य असून, बॅटरी तंत्रज्ञान, विद्युतीकरण आणि भविष्यातील मोबिलिटीशी संबंधित सुमारे ४० संशोधन प्रकल्प सुरू आहेत.

ह्युंडाई मोटर ग्रुपचे कार्यकारी अध्यक्ष युसन चंग म्हणाले, “भारत ही ह्युंडाईची जागतिक स्तरावरील सर्वात महत्त्वाची आणि धोरणात्मक बाजारपेठ आहे. पुणे प्रकल्पाचे उद्घाटन भारताच्या विकासाप्रती असलेली आमची दीर्घकालीन कटिबद्धता दर्शवते. भारतातून ४० लाख वाहनांच्या निर्यातीचा टप्पा देशातील उत्पादनाची जागतिक स्पर्धात्मकता सिद्ध करतो.”

सामाजिक उपक्रमांतून महाराष्ट्रात योगदान

ह्युंडाई मोटर इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून कंपनी महाराष्ट्रात विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. कंपनीच्या माहितीनुसार, ‘आयोनिक फॉरेस्ट’ उपक्रमांतर्गत १० लाखांहून अधिक झाडे लावण्यात आली असून, पाच वर्षांत सुमारे ६३ हजार टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट आहे.

‘स्पर्श संजीवनी’ उपक्रमाचा ५० हजारांहून अधिक ग्रामीण रहिवाशांना लाभ झाला आहे. ‘होप४कॅन्सर’ उपक्रमांतर्गत २० तपासणी शिबिरांच्या माध्यमातून दोन हजारांहून अधिक व्यक्तींपर्यंत कर्करोग तपासणी व प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा पोहोचवण्यात आली आहे. ‘प्रोजेक्ट एच₂ओपीई’द्वारे एक लाख २० हजारांहून अधिक शालेय विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.

कौशल्य विकास आणि कल्याणकारी उपक्रमांच्या माध्यमातून दीड लाखांहून अधिक नागरिकांचे सक्षमीकरण करण्यात आले असून, महाराष्ट्रात विविध शासकीय कल्याणकारी योजनांचे जवळपास ३०० कोटी रुपयांचे लाभ मिळवून देण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे.

भारतातील ३० वर्षांच्या प्रवासात नवा अध्याय

ह्युंडाई मोटर इंडिया भारतातील ३० वर्षांचा प्रवास साजरा करत असताना तळेगाव येथील हा प्रकल्प कंपनीच्या विस्तारातील महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. उत्पादन क्षमता वाढवणे, स्थानिक पुरवठादारांना संधी देणे, रोजगारनिर्मिती करणे आणि भविष्यातील वाहन तंत्रज्ञान विकसित करणे या उद्दिष्टांसह कंपनीने भारतातील आपली उपस्थिती अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे.

ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण गर्ग यांच्या मते, पुणे प्रकल्पामुळे या प्रदेशातील औद्योगिक विकास, नावीन्य आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळेल. ग्राहक, भागीदार आणि स्थानिक समुदायांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्यासाठी कंपनी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments