Sunday, March 23, 2025
Homeराजकारणसिने नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांना श्री मोरया गोसावी महाराज जीवनगौरव पुरस्कार...

सिने नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांना श्री मोरया गोसावी महाराज जीवनगौरव पुरस्कार प्रदान

माझ्या अभिनयाची मुहूर्तमेढ इथे रोवली गेली – प्रशांत दामले

माझे रंगमंचावरील पदार्पण चिंचवड येथे शिक्षण घेत असताना झाले. कॉलेज मध्ये असताना एका नाटकात प्रथम काम केले होते. तिथेच माझ्या अभिनयाची मुहूर्तमेढ रोवली गेली, असे मत सिने अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले.

विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्या हस्ते सिने नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांना श्री मोरया गोसावी महाराज जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी दामले बोलत होते. कार्यक्रमासाठी मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त केशव विद्वंस, देवराज डहाळे, जितेंद्र देव, ॲड. राजेंद्र उमाप, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, मोरेश्वर शेडगे, विठ्ठल भोईर आदी उपस्थित होते.

प्रशांत दामले म्हणाले, “चिंचवड मध्ये मी शिक्षणासाठी आलो. इथे आल्यापासून माझ्यातील भीती गेली. मुंबईत राहणाऱ्या मुलांना वेगळेपणाची भावना असते. इथे अरे ला कारे करायला शिकलो. तसा आत्मविश्वास चिंचवड मध्ये वाढला. इंग्रजी वर्षाचा पहिला दिवस आणि या दिवशी मला जीवनगौरव पुरस्काराच्या रूपाने मोरया गोसावी महाराजांचा प्रसाद मिळाला, हे मी माझे भाग्य समजतो. हा पुरस्कार माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे.

त्यात उज्वल निकम यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाल्याने त्याचा वेगळा आनंद आहे. संधी मिळेल तेंव्हा मोरया गोसावी महाराजांच्या दर्शनासाठी येत राहीन, असे सांगत प्रशांत दामले यांनी चिंचवड मधील अनेक स्मृतींना उजाळा दिला.

उज्वल निकम म्हणाले, “प्रशांत दामले यांना मोरया गोसावी महाराजांच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार मिळाला याचा मनस्वी आनंद आहे. आज समाजात ज्ञान संपादन करण्यासाठी कमीपणा घ्यावा लागतो. ज्ञानाला कमीपणाचे इंधन दिले तर समृद्धीचे दरवाजे खुले होतील. प्रत्येकाच्या मनात भारतीयत्वाची भावना जागृत करणे गरजेचे आहे. चिंचवड देवस्थान ट्रस्टने यासाठी पुढाकार घेऊन काही उपक्रम राबवावेत.”

देवस्थानच्या अखत्यारीत असलेल्या देवस्थानच्या ठिकाणी निर्माल्यापासून उदबत्ती बनविण्याचा उपक्रम देवस्थानने हाती घेतला आहे. भारताबाहेर आणि अमराठी भाषिक मोरया भक्तांसाठी चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या इंग्रजी वेबसाईटचे लोकार्पण करण्यात आले असल्याचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी सांगितले.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. यामध्ये चित्रकार, लेखनकार रामदास बहुले, क्रीडापटू अवनीश भोईर, सामाजिक क्षेत्रासाठी जनार्दन थोरात, सुशांत पांडे, रवींद्र देव (देव मंडळातील पुरस्कार), श्रीकृष्ण कडूसकर, जयंत बागल, चंद्रकांत हावळे, अनिता हावळे, मोहन गपचूप, सूर्यकांत बारसावडे, मधुकर जोशी, ॲड. पोपटराव तांबे, डॉ. प्रशांत दौंडकर पाटील, गुणवंत कामगार पुरस्कार संजीव तांबे, मनोज जोगळेकर, भाद्रपद यात्रेतील उल्लेखनीय कामासाठी शरद रबडे आणि संदीप वाघमारे, स्वा.भालचंद्र देव यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा गुणवंत विद्यार्थी पुरस्कार वेदांत कोषे आणि रोहित बेलसरे यांना प्रदान करण्यात आला व स्व.महाबळेश्वरकर गुरुजी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार श्री मनोज माधव जोगळेकर यांना देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments