१७ नोव्हेंबर २०२०,
पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी मधील बालाजी नगर येथे मानवी कवटीसह काही हाडे एका पाण्याच्या हौदात सापडली आहेत. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक शोध घेत आहेत. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना समोर आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
“भोसरीच्या बालाजी नगर येथे मानवी शरीराच्या काही भागाची हाडे सापडली आहेत. त्यात मानवी कवटी आणि इतर भागांचा समावेश आहे. दोन मुलं सुलभ शौचालयाच्या हौदात मासे पकडत होते. तेव्हा, त्यांना एका प्लास्टिकच्या पिशवीत कवटीसह हाडे मिळाली आहेत. या घटनेचा तपास सुरु असून सापडलेली हाडे तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. त्यानंतर योग्य ती पुढील कारवाई केली जाईल,” अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गवारे यांनी दिली आहे.
हाडे बाहेरून आणून तिथे टाकल्याचा संशय पोलिसांना असून इतर हाडांचा शोध घेतला जात आहे. याशिवाय परिसरात कोणी बेपत्ता आहे का? याचा देखील शोध घेतला जात आहे. तसेच या घटनेबाबत स्थानिकांकडे चौकशी केली जात आहे. सीसीटीव्हीचीही मदत घेतली जात आहे. कवटी आणि हाडे पुरुषाची आहेत की महिलेची हे अद्याप समजू शकलेले नाही.