शनिवारपासूनच मुंबईत सुरू झालेला पाऊस आता थांबण्याचे नाव घेत नाहीये. हवामान खात्याने पुढील २४ तासांसाठी अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार शहरात मुसळधार पाऊस पडू शकतो. तर दोन दिवसांत तीन घरे कोसळण्याच्या घटना समोर आल्या आहेत. पावसामुळे आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
संपूर्ण राज्यासह शनिवारपासून मायानगरी मुंबईतही मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र, उशिराने पण जोरदार हजेरी लावल्याने शेतकरीही सुखावला आहे. अशात मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. अशातही बोरिवली, दहिसर आणि जोगेश्वरी भागात घरं पाण्याखाली गेली होती. त्यामुळे घरातील टीव्ही आणि फ्रीजही वाहून गेल्याचे दिसून आले. त्याचवेळी मुंबईत चार ठिकाणी घर कोसळल्याची बातमी समोर आली आहे. मुंबईत दोन दिवसांच्या पावसाने आतापर्यंत ६ जणांचा बळी घेतला आहे. तर पुढील २ दिवस मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हवामान खात्यानेही यासंदर्भात अलर्ट जारी केला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या दोन दिवसांत किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी आणि मुंबईसह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडताना छत्री आणि रेनकोट सोबत ठेवावे, अन्यथा त्यांना त्रास होऊ शकतो.
दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
हवामान खात्यानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. त्यामुळे कोकण तसेच मुंबई आणि मध्य महाराष्ट्रात येत्या ४८ तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नैऋत्य मान्सूनची प्रदीर्घ काळानंतर वेगाने प्रगती होत आहे. जे अधिकाधिक क्षेत्र व्यापत आहे.
दरम्यान, मुंबईत गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. तर विशेष म्हणजे रविवारी ६२ वर्षांनंतर पहिल्यांदाच मुंबई आणि दिल्लीत एकाच वेळी पाऊस झाला. मुंबईत गेल्या २४ तासात ८६ मिमी पावसाची नोंद झाली झाली आहे तर या पावसामुळे अंधेरीच्या मिलन सबवेमध्ये पाणी तुंबलं होतं.