Tuesday, July 16, 2024
Homeताजी बातमीविद्यार्थी आत्महत्या का करतात?

विद्यार्थी आत्महत्या का करतात?

प्रचंड स्पर्धेला तोंड देताना विद्यार्थ्याच्या मनावर खूप ताण येतो.

कालच पोटात गलबलवणारी बातमी वाचली. कोटा या शहरामध्ये गेल्या सहा महिन्यात १३ विद्यार्थ्यांनी आत्महत्त्या केल्या. २०१८ साली आयआयटीमध्ये शिकणाऱ्या ३५ मुलांनी आत्महत्त्येचा मार्ग स्वीकारला आणि दरवर्षी ही संख्या वाढतेच आहे. दहावी बारावीच्या निकालानंतरसुद्धा अशा बातम्या येतातच.

नुकतीच ज्या विद्यार्थ्याविषयी बातमी आली होती तो होता बिहारचा, एक खोली घेऊन अभ्यासासाठी कोट्यामध्ये राहिलेला जवळजवळ दीड लाख मुलांपैकी एक. डॉक्टर होण्याचे स्वप्न घेऊन आपल्या घरापासून दूर एकटा राहणारा मुलगा. यंदा नीट परीक्षेला २० लाख मुले बसली, तर जेईईला १८ लाख मुले बसली. म्हणजे किती जणांना डॉक्टर आणि आयआयटीमधून इंजिनियर व्हायचे आहे, पाहा! अशा जीवघेण्या स्पर्धेला तोंड देताना मुलांची काय अवस्था होत असेल, कल्पनाच केलेली बरी

आपल्या तरुणाईचा एक हिस्सा असा हकनाक गमावणे आपल्या समाजाने चालवून घेता कामा नये. म्हणूनच आधी विद्यार्थ्यांच्या मनात आत्महत्त्या करावी असे का येत असेल ते पाहिले पाहिजे. ‘माझ्या घरी सगळेच डॉक्टर आहेत! त्यामुळे मग स्वाभाविकच मीही डॉक्टर होणार, असे लहानपणापासूनच ठरले होते! पण प्रत्यक्ष परीक्षेची तयारी करताना माझ्या मनावर फारच दडपण येऊ लागले. नाहीच मिळाले चांगले मार्क तर? नाहीच मिळाली अ‍ॅडमिशन तर? चांगलाच घाबरलो. अभ्यासातले लक्षच उडाले. सतत टेन्शन, मनात नुसती भीती. कोणाला कसे सांगायचे, काय म्हणतील मला? अरे, तुझे वडील नेहमीच पहिले आलेत, तुला काय झालं घाबरायला? त्यापेक्षा परीक्षाच नको! म्हणून शेवटी अत्म्हत्त्येकडे वळलो’ अनिकेत सांगत होता. त्याच्या आईवडलांना तर धक्काच बसला होता. त्याचे क्लास, खाणे पिणे वेळेवर होणे, सगळ्या सुखसोयी त्याला अभ्यासाला उपलब्ध करून देणे, सगळे केले होते त्यांनी. कधीच त्याच्यावर दबाव आणला नव्हता की अपेक्षा व्यक्त केल्या नव्हत्या! मग असे का?

‘नीट परीक्षा तिसऱ्यांदा दिली होती त्याने. काहीही करून यंदा मेडिकलला जायचेच असे त्याने ठरवले होते. पण परत नापास झाला आणि …’ असे अनेक अनुभव! प्रचंड स्पर्धेला तोंड देताना विद्यार्थ्याच्या मनावर खूप ताण येतो. क्लासमधले वातावरणही खेळीमेळीचे न राहता स्पर्धात्मक होते आणि प्रत्येक विद्यार्थी आपापल्या कोशात जातो. आपल्याकडे अजूनही प्रतिष्ठेचे समजले जाणारे शिक्षणाचे पर्याय म्हणजे मेडिकल आणि इंजिनियरिंग. या व्यतिरिक्त इतके वेगवेगळे पर्याय आज उपलब्ध आहेत आणि होताहेत की सगळ्या शिक्षणाकडे पाहण्याचा रोखच बदलायला हवा आहे. मुलांना मनावर येणारे दडपण व्यक्त करण्याची जागा असणे अत्यावश्यक आहे. आईवडील, एखादे जवळचे नातेवाईक, कुटुंबाचे स्नेही कोणाचा तरी त्याच्याशी संवाद असेल तर अनेक गोष्टी सुकर होतील. मुळात निवडलेला शिक्षणाचा मार्ग त्याला हवा असलेला आहे ना, हे पाहिले पाहिजे.

अनेक पर्यायांशी विद्यार्थ्यांची ओळख करून दिली पाहिजे. हा विश्वास दिला पाहिजे की कोणत्याही क्षेत्रात गेले तरी यश मिळते. जेव्हा मनावरचा ताण असह्य होतो, सतत चिंता वाटते, डिप्रेशन येते, आत्महत्त्येचे विचार मनात यायला लागतात, तेव्हा हा संवादाचा मार्ग उपलब्ध असेल तर वेळच्यावेळी मदत होऊ शकते. मनोविकारतज्ज्ञाकडे नेणे, उपचार सुरू करणे, आपल्या मुलाबरोबर असणे, कधी बोलण्यातून, कधी आपल्या लहानशा स्पर्शातून, पाठ थोपटण्यातून त्याला धीर देता येईल. आपल्या मुलाच्या कठीण प्रसंगात आपण त्याच्याबरोबर असलो तर त्याला अशा बिकट प्रसंगाला तोंड देणे शक्य होईल.

‘I am a failure’ डोळ्यात पाणी आणून मनीष सांगत होता. आपल्या आईवडिलांना नापास झाल्यावर सामोरेच जायला नको. कारण आपण नापास झालो ही शरमेची गोष्ट आहे, असे त्याला वाटले. अपयश आणि यश हे दोन्ही या आयुष्यात एकदा नाही तर अनेकदा येणारे अनुभव असतात, हे समजावून सांगितले पाहिजे. यश म्हणजे तरी काय असते? परीक्षेत उत्तम मार्क मिळणे हे जसे यश आहे, तसेच घरातला नळ दुरुस्त करण्यातही यश आहे. अपयश पचवायचे तर मन सुदृढ हवे. मनाला लवचिकता हवी. कोणत्याही प्रसंगात न डगमगून जाता त्या त्या परिस्थितीला तोंड देण्याची मानसिकता हवी. म्हणूनच केवळ मेडिकल तर मेडिकल, आयआयटी एके आयआयटीच असे न करता, माझा पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय अशी जंत्री तयार हवी. अगदी तिसऱ्या क्रमांकाची संधी मिळाली तरी मग लक्षात येईल की आपल्याला हेही शिकायला आवडते आहे आणि पुढे जाऊन तिथेही अनेक संधी आहेत.

समाजापासून तुटलेले कुटुंब, अतिशिस्तप्रिय पालक, डोळ्यावर झापडे ठेवून शिक्षणाचा विचार आणि अतिअपेक्षा अशांनी मनावरचा ताण वाढतो आणि आत्महत्त्येचा धोका वाढतो. कॉलेजजीवनात नवीन अभ्यासक्रमाबरोबर नवीन वातवरण, नवीन मित्र अशा अनेक गोष्टींशी जुळवून घ्यावे लागते. एखाद्या विद्यार्थ्याची दादागिरी करून छळवणूक (bullying) केली जाते, मुद्दाम चिडवणे, कुरापती काढणे तर कधी शारीरिक आणि लैंगिक शोषणापर्यंत काही जणांची मजल जाते.

महाविद्यालयात सजग प्राध्यापक असतील, मार्गदर्शक (mentor) असतील तर विद्यार्थ्यांना मन मोकळे करायला जागा मिळते, अन्यथा मनावरचा ताण वाढत राहतो. हेच वय बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड मिळवण्याचे असते. अशा नातेसंबंधातली ओढाताण कधी कधी मनाचे संतुलन बिघडवणारी असते. अशा विविध कारणांनी मनःस्वास्थ्य बिघडते. डिप्रेशन, अतिचिंता असे मनोविकार होतात. विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांचे वाढते प्रमाण दिसून येते. वेळच्यावेळी मदत मिळणे, उपचार सुरू होणे गरजेचे असते. महाविद्यालयामध्ये समुपदेशन केंद्र असणे, संवेदनशील प्राध्यापक असणे, आपल्या मुलाच्या मनाची आंदोलने ओळखू शकणारे पालक या काही गोष्टींमुळे आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर लवचिकपणे आणि आनंदाने पुढचे पाऊल टाकणारे विद्यार्थी तयार होतील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments